‘लालबागचा राजा’कडून शहिदांच्या कुटुंबीयांना मदत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2019 12:39 AM2019-03-07T00:39:38+5:302019-03-07T00:39:44+5:30
पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झलेल्या महाराष्ट्रातील दोन जवानांच्या कुटुंबीयांना बुधवारी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून प्रत्येकी पाच लाखांच्या अर्थसाह्याचा धनादेश वितरित करण्यात
मुंबई : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झलेल्या महाराष्ट्रातील दोन जवानांच्या कुटुंबीयांना बुधवारी लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून प्रत्येकी पाच लाखांच्या अर्थसाह्याचा धनादेश वितरित करण्यात आला.
गणेश गल्ली येथील रस्त्याचे बुधवारी ‘लालबागचा राजा मार्ग’ असे नामकरण करण्यात आले. यावेळी हुतात्मा सैनिकांच्या कुटुंबीयांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला महापौर विश्वनाथ महाडेश्वर, खासदार अरविंद सावंत, मंडळाचे मानद सचिव सुधीर साळवी, अध्यक्ष बाळासाहेब कांबळे, खजिनदार मंगेश दळवी आदी उपस्थित होते.
हुतात्मा मेजर कौस्तुभ राणे यांच्या पत्नी कनिका, हुतात्मा संजय राजपुत यांच्या पत्नी सुषमा, हुतात्मा नितीन राठोड यांच्या पत्नी वंदना आणि अन्य कुटुंबीय या वेळी उपस्थित होते. पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या तणावाचे पडसाद समाजमाध्यमांतही उमटत आहेत. एखादी पोस्ट लाइक करणे किंवा शेअर करणे म्हणजे आपली जबाबदारी पार पाडणे नव्हे, असेही कनिका यांनी सुनावले.
त्या म्हणाल्या, सीमेवर आणि दहशतवाद्यांशी लढताना रोज जवान प्राणांची आहुती देत आहेत. मोठ्या संख्येने जवान शहीद झाले तरच आपण जागे होणार का? पुलवामात ४४ जवान गेले. परंतु चकमकीत शहीद होणाऱ्या सैनिकांबद्दल आपल्या संवेदना का जाग्या होत नाहीत? गेल्या वर्षी विविध चकमकींत ८० जवानांनी प्राणाची आहुती दिली. मात्र, आज त्यांचा समाजाला विसर पडला आहे़