‘लालबागचा राजा’ मंडळाच्या मुजोरीला बसला चाप
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 06:11 AM2018-10-16T06:11:33+5:302018-10-16T06:11:53+5:30
दर्शनरांगेच्या धोरणासाठी त्रिसदस्यीय समिती : ओळखीच्या लोकांना रांग सोडून पुढे न पाठवण्याची मंडळ पदाधिकाऱ्यांना ताकीद
मुंबई : लालबागचा राजा मंडळाचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांच्या मुजोरीला आता चाप बसेल. मंडळाचे पदाधिकारी आणि पोलिसांत दरवर्षी होणारा वाद टाळण्यासाठी राज्य धर्मादाय आयुक्तांनी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्याचे निर्देश सोमवारी दिले. सर्व प्रकारच्या दर्शनरांगांच्या नियोजनाचे अधिकार या समितीकडे सोपवितानाच मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी रांग मोडून ओळखीच्या लोकांना पुढे पाठवू नये, अशी सक्त ताकीदही धर्मादाय आयुक्तांनी दिली.
दर्शनरांगेतील लोकांना पुढे सोडण्याच्या मुद्द्यावरून यंदा उत्सव काळात पोलीस अधिकारी आणि मंडळाच्या पदाधिकाºयांमध्ये धक्काबुक्की झाली. शिवाय, रांगेतील महिला भाविकांशीही गैरवर्तनाचे प्रकार घडत असल्याचे समोर आले. याची गंभीर दखल घेत धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी चौकशीचे आदेश दिले होते. धर्मादाय उपायुक्त भरत व्यास यांनी या घटनांची चौकशी करत अहवाल धर्मादाय आयुक्तांना सादर केला. दरवर्षी व्ही.आय.पी. आणि व्ही.व्ही.आय.पी. दर्शनरांगेतून दर्शनाबाबत अनेकदा वादाचे प्रसंग उद्भवतात. त्यामुळे या दर्शनरांगेसाठी पोलीस, मंडळाच्या पदाधिकाºयांना योग्य निर्देश देण्याची शिफारस या अहवालात होती.
अहवालाच्या आधारे दर्शनरांगेच्या व्यवस्थेसाठी त्रिसदस्यीय समिती स्थापन करण्यात येईल. समितीत धर्मादाय आयुक्तालय, मंडळ आणि पोलीस प्रशासनाचा प्रत्येकी एक सदस्य असेल. गणेशोत्सवाच्या आठ दिवस आधी ही समिती सर्व प्रकारच्या दर्शनरांगेसाठीचे धोरण निश्चित करेल.
दर्शनरांगेसाठीच्या धोरणासंदर्भात नियोजनाचे सर्व अधिकार, जबाबदारी समितीस देण्यात आली आहे. याशिवाय, दर्शनाबाबत काही वाद झाल्यास धर्मादाय कार्यालयातील प्रतिनिधींचा निर्णय अंतिम राहील, असेही धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी आपल्या आदेशात स्पष्ट केले आहे.
‘पोलिसांनी अडवणूक करू नये’
पोलिसांवर कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी आहे. दर्शनरांगेत गोंधळ होणार नाही याची खबरदारी त्यांनी घ्यावी. मात्र, दर्शनरांगेच्या नियोजनात हस्तक्षेप करू नये. पोलिसांमार्फत जाणारे व्ही.आय.पी. आणि इतरांचे लोक व्ही.आय.पी. नाहीत अशी भूमिका घेत पोलिसांनी अडवणूक करू नये, असेही धर्मादाय आयुक्तांनी आदेशात स्पष्ट केले.
महिला स्वयंसेवकांची नियुक्ती
मंडळांच्या पुरुष पदाधिकाºयांकडून महिला भाविकांना धक्काबुक्कीचे व्हिडीओ गेल्या काही काळात व्हायरल झाले होते. त्यानंतर आता महिला भक्तांना सुरळीत दर्शन घेता यावे यासाठी महिला स्वयंसेवक नेमण्याचे आदेशही देण्यात आले.
पारदर्शक मोजणी
लालबागच्या राजाच्या चरणी येणाºया कोट्यवधीच्या देणगीची पारदर्शक मोजणी आवश्यक आहे. त्यासाठी धर्मादाय कार्यालयाचा प्रतिनिधी मोजणी करताना उपस्थित राहील.