Lalbaugcha Raja: 'लालबागचा राजा'च्या प्राणप्रतिष्ठेस विलंब, पोलिसांच्या कडक सुरक्षेनं स्थानिक त्रस्त, नांगरे पाटील पोहोचले!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2021 12:27 PM2021-09-10T12:27:23+5:302021-09-10T12:28:11+5:30
Lalbaugcha Raja: मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या 'लालबागचा राजा' मंडळाच्या श्रींच्या प्रतिष्ठापनेला विलंब होत असल्याची माहिती समोर आली आहे.
Lalbaugcha Raja: मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या 'लालबागचा राजा' मंडळाच्या श्रींच्या प्रतिष्ठापनेला विलंब होत असल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी लालबागचा राजा मंडळ परिसरात केलेल्या कडक सुरक्षेमुळे स्थानिकांना मोठ्या त्रासाला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे स्थानिक रहिवासी आणि व्यापाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिकांच्या मागणीवर लालबागचा राजा मंडळ देखील ठाम असून पोलिसांसोबत वाद सुरू आहे. त्यामुळे गेल्या दिड तासांपासून लालबागचा राजाच्या प्राणप्रतिष्ठेला विलंब होत आहे.
मुंबईचे पोलिसांच्या कायदा सुव्यवस्था विभागाचे सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील देखील लालबागचा राजा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यासाठी पोहोचले आहेत. यावेळी नांगरे पाटील यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे. मंडळाशी चर्चा करायला मी इथं आलो आहे, इतकंच बोलून नांगरे पाटील लालबागचा राजा मंडळाच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करायला पोहोचले आहेत.
नेमका वाद काय?
लालबागचा राजा मंडळ परिसरात व्यापाऱ्यांची अनेक दुकानं आहेत. पण कोविड नियमांमुळे आणि गणेशोत्सव काळात लालबागचा राजाच्या श्रींचं दर्शन घेण्यासाठी गर्दी होऊ शकते या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी परिसरातील सर्व दुकानं बंद ठेवली आहेत. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये नाराजीचं वातावरण आहे. त्यासोबतच लालबागचा राजा मंडळ परिसराला पूर्णपणे पोलीस छावणीचं स्वरुप आलं आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांना आपल्या घरी जाण्यासही मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागत आहे.