Join us

Lalbaugcha Raja First Look: 'लालबागचा राजा'चा मुखदर्शन सोहळा जल्लोषात; भाविकांची तुफान गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2022 8:43 PM

२ वर्षांच्या अंतराने यंदा पुन्हा एकदा गणेशोत्सव मोठ्या जल्लोषात साजरा होणार आहे.

Lalbaugcha Raja Mukhadarshan : मुंबईतीलगणेशोत्सव म्हटलं की त्यात अनेक मोठे आणि मानाचे गणपती भाविकांचे लक्ष वेधून घेतात. त्यापैकी नवसाला पावणारा असा मुंबईतील प्रसिद्ध लालबागचा राजा कायमच भाविकांसाठी श्रद्धास्थान असते. लालबागचा राजा गणेशाच्या यंदाच्या मूर्तीचे सोमवारी सायंकाळी ७ वाजता अनावरण करण्यात आले आणि त्यानंतर आपल्या लाडक्या बाप्पाची पहिली झलक (First Look) म्हणजेच मुखदर्शन घेण्यासाठी भाविकांनी अक्षरश: रांगा लावल्या. 'लालबागचा राजा'ची किर्ती चहुबाजूंना आणि दशदिशांमध्ये पसरलेली असल्याने आज मुखदर्शनाच्या वेळी भाविकांनी प्रचंड गर्दी केल्याचे दिसून आले. ठरलेल्या वेळेनुसार, सायंकाळी यंदाच्या लालबागचा राजा गणेश मूर्तीवरून पडदा बाजूला करण्यात आला आणि त्यानंतर भाविकांनी गणपती बाप्पा मोरयाचा एकच जयघोष केला.

'लालबागचा राजा' मुखदर्शन सोहळा-

लालबागच्या राजाचे यंदा ८९ वे वर्ष आहे. प्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांनी यासाठी यंदाच्या लालबागचा राजा गणेश भक्तांसाठी डोळ्याचे पारणे फेडेल असा देखावा तयार केला आहे. यंदा अयोध्येतील राम मंदिराचा देखावा साकारण्यात आला असून बुधवारपासून गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे. त्याआधी आज लालबागच्या राजाची यंदाची विशेष गणेश मूर्ती मंडपात विराजमान झाली. त्यानंतर आज आपल्या लाडक्या लालबागच्या राजाचे पहिले दर्शन घेण्यासाठी भाविकांनी आणि फोटोग्राफर्सनी मंडपाजवळ मोठी गर्दी केली. मूर्तीचे मुखदर्शन सोहळा करण्यापूर्वी पडदा उघडताना भाविकांनी अक्षरश: काऊंटडाऊन केले. कोरोनाच्या दोन वर्षांच्या अंतरानंतर भाविकांमध्ये अतिशय उत्साहाचे आणि चैतन्याचे वातावरण असल्याचे दिसून आले. यावेळी सर्वच ठिकाणाहून भाविकांनी गर्दी केली आणि सेल्फी घेण्यासाठी झुंबड उडाल्याचे दिसले.

टॅग्स :गणेशोत्सवलालबागचा राजामुंबई