Lalbaugcha Raja Ganapati Visarjan 2022: तब्बल २३ तासांनी 'लालबागच्या राजा'चं विसर्जन; अलोट गर्दीत भक्तांचे डोळे पाणावले

By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 09:16 AM2022-09-10T09:16:52+5:302022-09-10T09:22:00+5:30

गिरगावच्या समुद्रात कोळी बांधवांकडून लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आले.

Lalbaugcha Raja Ganapati Visarjan 2022: Immersion of the ' Lalbaugcha Raja' after 23 hours; The eyes of the devotees were filled with tears | Lalbaugcha Raja Ganapati Visarjan 2022: तब्बल २३ तासांनी 'लालबागच्या राजा'चं विसर्जन; अलोट गर्दीत भक्तांचे डोळे पाणावले

Lalbaugcha Raja Ganapati Visarjan 2022: तब्बल २३ तासांनी 'लालबागच्या राजा'चं विसर्जन; अलोट गर्दीत भक्तांचे डोळे पाणावले

Next

मुंबई - मागील १० दिवसांपासून उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात होता. त्यानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी हजारो भाविकांनी लालबाग येथे गर्दी केली होती. मुंबईसह महाराष्ट्रात गणपती विसर्जन मिरवणुका जल्लोषात निघाल्या. यात लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाची मिरवणूक शुक्रवारी दुपारी १२ वाजता मंडपातून निघाली होती. तब्बल २३ तासांच्या मिरवणुकीनंतर लालबागच्या राजाचं गिरगावच्या समुद्रात विसर्जन करण्यात आले. सकाळी ९.१४ मिनिटांनी लालबागच्या राजाचं विसर्जन झालं. 

गिरगावच्या समुद्रात कोळी बांधवांकडून लालबागच्या राजाचं विसर्जन करण्यात आले. तराफाच्या सहाय्याने 'लालबागचा राजा'ला खोल समुद्रात नेण्यात आले. लालबागचा राजा गिरगाव चौपाटीवर पोहचला तेव्हा भक्तांचा जनसागर उसळलेला पाहायला मिळाला. मागील २ वर्ष कोरोनामुळे उत्सवांवर अनेक निर्बंध लादण्यात आले होते. त्यामुळे यंदा मोठ्या उत्साहात गणेशभक्त घराबाहेर पडले. परंपरेनुसार यंदा लालबागच्या राजाला गिरगाव चौपटीला निरोप देण्यासाठी भक्त मोठ्या संख्येने जमले होते. साश्रूनयनांनी याठिकाणी गणेशभक्तांनी लालबागच्या राजाला निरोप देत पुढच्या वर्षी लवकर या अशी आरोळी दिली. 

लालबागच्या राजाचा थाटच न्यारा... 
गणेशोत्सव काळात सर्वांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू असलेल्या लालबागच्या राजाचा थाटच न्यारा असेच म्हणावे लागेल. नवसाला पावणारा अशी ख्याती असलेला लालबागचा राजाचं दर्शन घेण्यासाठी १० दिवसांत लाखो गणेशभक्त लालबागला हजेरी लावतात. दर्शनासाठी याठिकाणी भाविकांच्या लांबच्या लांब रांगा असतात. २४ तास भाविकांची अलोट गर्दी लोटल्याचं दिसून येते. गणेश विसर्जनाच्या वेळीही मुंबईच्या रस्त्यांवर तुडुंब गर्दी असते. यंदा निर्बंधमुक्त गणेश उत्सव साजरा होत असल्याने लालबागच्या राजाचं दर्शनासाठी अलोट गर्दी झाली. रस्त्यालगतच्या इमारती, टेरेस, उड्डाणपूल येथे भाविकांनी लालबागच्या राजाची एक झलक पाहण्यासाठी गर्दी केली होती. 

मिरवणुकीत चोरांचा सुळसुळाट
लालबागच्या राजासह अनेक गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत भाविकांची गर्दी पाहता चोरांचा सुळसुळाट झाला. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी तब्बल ५० मोबाईल, सोन्याचे दागिने लंपास केले. त्याचा फटका गणेशभक्तांना बसला. गणेश मिरवणुकीत मोबाईल चोरी, पाकीट चोरीच्या, सोन्याचे दागिने लंपास झाल्याच्या घटना मोठ्या प्रमाणात घडल्या. याबाबत पोलीस तक्रार देण्यासाठी काळाचौकी पोलीस ठाण्यात तक्रारदारांची रांग लागली होती. 
 

Web Title: Lalbaugcha Raja Ganapati Visarjan 2022: Immersion of the ' Lalbaugcha Raja' after 23 hours; The eyes of the devotees were filled with tears

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.