Join us

Lalbaugcha Raja: ठाकरे कुटुंब बाप्पाचरणी लीन, उद्धव ठाकरेंनी सहपरिवार घेतले लालबागच्या राजाचे दर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2022 11:26 PM

राज्यात शिवसेनेत मोठी बंडाळी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला.

मुंबई - मागील २ वर्ष कोविडच्या महामारीमुळे गणेशोत्सवासह सर्वच सणांवर निर्बंध लावण्यात आले होते. परंतु यंदा सणांवरील निर्बंध हटवल्यामुळे मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. त्यात लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी २४ तास भाविकांची प्रचंड गर्दी असते. गणेश चतुर्थीनिमित्त आज घरोघरी बाप्पाचं आगमन झालं. आजच्या दिवशी लालबागच्या राजाचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. तर, सेलिब्रिटीं आणि राजकीय नेत्यांनीही आज पहिल्याच दिवशी दर्शन घेतले. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. 

राज्यात शिवसेनेत मोठी बंडाळी झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर, महाविकास आघाडीचं सरकारही पायउतार झालं. शिवसेनेते बंडखोर केलेल्या एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर, उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. शिवसेनेसाठी हा अतिशय कठिण काळ आहे. उद्धव ठाकरेंना पक्षप्रमुख मानणारे आमदारही आता त्यांच्यावर टिका करत आहेत. आदित्य ठाकरे हे बंडखोरांवर जोरदार टिका करत आहेत. मात्र, उद्धव ठाकरेंचा संयमी स्वभाव महाराष्ट्र पाहत आहे. त्यातच, आज उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. 

उद्धव ठाकरे यांनी पत्नी रश्मी ठाकरे आणि मुलगा आदित्य व तेजस ठाकरे यांच्यासह लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. यावेळी, ट्रस्टच्यावतीने त्यांचा सन्मानही करण्यात आला. दरम्यान, विधासभाअध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही आज लालबागच्या राजाचे दर्शन घेतले. तसेच, अभिनेता कार्तीक आर्यनही बाप्पांच्या चरणी नतमस्तक झाला होता. 

दर्शनासाठी सकाळपासून मोठी गर्दी

सकाळपासून लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भक्त मोठ्या संख्येने आले आहेत. त्यात महिला भाविक आणि महिला सुरक्षा रक्षक यांच्यात धक्काबुक्की झाल्याचा प्रकार घडला. अनेकवेळा भाविक राजाच्या दर्शनानंतर काही क्षण उभे राहण्याचा प्रयत्न करतात परंतु वेळेमुळे याठिकाणी भाविकांना पुढे सरकवण्यासाठी धक्का दिला जातो. त्यातूनच हा वाद झाला. मात्र काही वेळानंतर सुरळीतपणे दर्शन सुरू झालं आहे. 

'लालबागचा राजा' इथं श्री राम मंदिराची प्रतिकृती

गेल्या २ वर्षापासून कोरोनामुळे गणेशोत्सवावर निर्बंध होते. परंतु यंदा शिंदे-फडणवीस सरकारने हे सर्व निर्बंध हटवल्यामुळे मोठ्या जल्लोषात भाविकांनी बाप्पाच्या स्वागताची तयारी सुरू केली. मुंबईतील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागचा राजाचं दर्शन घेण्यासाठी ११ दिवस भाविक अलोट गर्दी करतात. याठिकाणी यंदा लालबागच्या राजाचा दरबार अयोध्येतील प्रभू श्री राम मंदिराच्या देखाव्याने सजला आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागच्या राजाला ओळखले जाते. करोडो भाविक गणेशोत्सवाच्या काळात आपल्या लाडक्या बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मुंबईतील लालबाग या ठिकाणी येतात. लालबागच्या राजाची सुरूवात कोळी बांधवांनी केली होती. कोविड निर्बंधानंतर यावेळी भाविकांनी पहिल्या दिवसापासून दर्शनासाठी रांग लावली आहे.  

टॅग्स :उद्धव ठाकरेलालबागचा राजाशिवसेनामुंबई