लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : सध्या राज्यभर चर्चेत असलेला ड्रग्स माफिया ललित पाटील हा पुण्यातील ससून रुग्णालयातून कसा फरार झाला? त्याला कोणता आजार होता? रुग्णालयातील त्याचे वास्तव्य वाढविण्यासाठी रुग्णालयातील डॉक्टरांनी काही मदत केली का? कैदी उपचारासाठी रुग्णालयात दाखल असताना बाहेर कसा फिरत होता? याची माहिती मिळण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने समिती स्थापन केली होती. त्या समितीने हा अहवाल विभागाच्या आयुक्तांना देणे अपेक्षित होते. मात्र त्या समितीला आणखी एक आठवड्याची मुदत दिली असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी लोकमतशी बोलताना दिली.
डॉ. म्हैसेकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला असून त्यांनी समितीला मुदतवाढ दिली असल्याचे सांगितले. तसेच त्यांनी पुढे असेही सांगितले की, ‘काही कागदपत्रांची चौकशी आम्ही करत आहोत, लवकरच आम्ही आमचा अहवाल शासनाला सादर करू.’
समितीचे सदस्य कोण?
ड्रग्स माफिया पाटील याच्या प्रकरणाची चौकशी करण्याकरिता वैद्यकीय शिक्षण संचालक डॅा. दिलीप म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीत सदस्य म्हणून डॉ. सुधीर देशमुख, अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर; डॉ. हेमंत गोडबोले, प्राध्यापक आणि विभागप्रमुख, न्यायवैद्यक शास्त्रविभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नांदेड आणि डॉ. एकनाथ पवार, प्राध्यापक विभागप्रमुख, अस्थिव्यंगोपचार शास्त्र विभाग, ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांचा समावेश आहे.