मुंबई : राज्यात निर्माण झालेल्या पूरपरिस्थितीमुळे कोकण, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि इतर ठिकाणच्या नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यांच्या मदतीसाठी जाणाऱ्या एनडीआरएफसाठी बस, तर दैनंदिन वस्तू पुरवठा करण्यासाठी एसटीचे ट्रक पाठवले जात असल्याची माहिती एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
रायगड, महाड, खेड, संगमेश्वर, चिपळूण, रत्नागिरी, तसेच कोल्हापूर, सांगली, पश्चिम महाराष्ट्र आणि इतर काही ठिकाणी पुराचा मोठा फटका बसला आहे. पूरस्थिती असलेल्या भागातील तहसीलदार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून एसटीच्या गाड्या मागितल्या जातात. त्यानुसार एसटी महामंडळाकडून मदत केली जाते. गुहागर येथून एनडीआरएफसाठी १० गाड्या, खेड आगारातून पूरग्रस्तांसाठी १ गाडी, रत्नागिरी विभागातून दैनंदिन साहित्याचे दोन ट्रक पाठविण्यात आले आहेत. कोल्हापूर विभागातून एनडीआरएफसाठी ४ गाड्या, मालवाहतुकीसाठी ५ ट्रॅक, तर २७ डेपोतून रुग्णवाहिका चालविण्यासाठी २० चालक पाठविण्यात आले आहेत.
परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी स्वतः पुढाकार घेऊन चिपळूण येथील ४००० जणांना दैनंदिन उपयोगी वस्तूंचे नऊ ट्रॅक पाठवले आहेत. त्यामध्ये जेवणासाठीची भांडी, सतरंजी, ब्लँकेट आदी गोष्टींचा समावेश आहे.