महामंडळाकडून प्रस्ताव तयार : कोरोना आणि इंधन दरवाढीचा फटका
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : महागाईने आधीच त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांना आणखी झळ सोसावी लागणार आहे. कोरोना आणि इंधनदरवाढीमुळे होणारे नुकसान भरून काढण्यासाठी येत्या काही दिवसांत एसटी महामंडळ भाडेवाढ करणार आहे. याबाबतचा प्रस्ताव एसटी महामंडळाने तयार केला आहे.
एसटी महामंडळाने २०१८ मध्ये १८ टक्के भाडेवाढ केली होती. त्यानंतर भाडेवाढ करण्यात आलेली नाही. एसटीचे दररोज २१ कोटी रुपयांचे उत्पन्न कोरोनाकाळात काही लाखांवर आले होते. सध्या जुलैमध्ये हे उत्पन्न ८ कोटींपर्यंत गेले आहे. पुरेसे उत्पन्न नसल्याने एसटी कर्मचाऱ्यांना वेतनासाठी राज्य सरकारची मदत घ्यावी लागत आहे.
एसटी महामंडळाच्या १५ ते १६ हजार बस डिझेलवर धावत आहेत. सध्या १० हजार गाड्या धावत आहेत त्यासाठी दररोज ८ लाख लिटर डिझेल लागत आहे. एसटीच्या महसुलाच्या ३८ टक्के महसूल हा इंधनासाठी खर्च होत आहे.
.............
२०१८ मध्ये डिझेल ७२ रुपये प्रतिलीटर मिळत होते. आता डिझेल ९७ रुपये प्रतिलीटर झाले आहे, तसेच कोरोनामुळेही मोठा फटका बसला आहे. उत्पन्नात घट झाली असून, वर्षाला ३५०० कोटीहून अधिक रुपयांचा फटका बसत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने भाडेवाढीचा प्रस्ताव तयार केला आहे.
वरिष्ठ अधिकारी, एसटी महामंडळ