बोगद्यातील दिव्यांची चोरी, पुढचे २१ दिवस अंधारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 01:10 AM2018-03-27T01:10:20+5:302018-03-27T01:10:20+5:30
चेंबूर ते दक्षिण मुंबईला जोडणाऱ्या पूर्वमुक्त मार्गावरील पांजरापोळ परिसरात असलेल्या बोगद्यातील दिवे चोरीला गेले आहेत.
मुंबई : चेंबूर ते दक्षिण मुंबईला जोडणाऱ्या पूर्वमुक्त मार्गावरील पांजरापोळ परिसरात असलेल्या बोगद्यातील दिवे चोरीला गेले आहेत. यामुळे गेले दोन आठवडे हा बोगदा अंधारात असून, त्याचा फटका येथील वाहतुकीला बसला आहे. या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे, तसेच या ठिकाणी तात्पुरती प्रकाशाची व्यवस्था करण्यात येणार आहे, परंतु नवीन दिवे बसवून विद्युत व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी आणखी २१ दिवसांचा कालावधी लागणार आहे.
पूर्वमुक्त मार्गावरील हा बोगदा ८०० मीटर लांबीचा आहे. या बोगद्यामध्ये महापालिकेद्वारे विद्युत दिव्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, दोन आठवड्यांपूर्वी अज्ञात व्यक्तींनी हे विजेचे दिवे चोरून तेथील विद्युत केबल जाळल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी महापालिकेच्या एम पूर्व विभाग कार्यालयाने पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. विद्युत पुरवठा व्यवस्था पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याचे, एम पूर्व विभागाचे सहायक आयुक्त श्रीनिवास किलजे यांनी दिली आहे.
या बोगद्यातून जाणाºया वाहतुकींची गैरसोय टाळण्यासाठी, जनित्र-संच बसवून तात्पुरत्या स्वरूपात प्रकाश व्यवस्था सुरू करण्यात येणार आहे. मात्र, नियमित स्वरूपातील प्रकाश व्यवस्थेसाठी विद्युत केबल व विद्युत दिवे बसविण्याचे काम महापालिकेला हाती घ्यावे लागणार आहे. हे काम पुढील २१ दिवसांत पूर्ण होणे अपेक्षित आहे, तसेच बोगद्यातील सुरक्षा व्यवस्थेसाठी सशस्त्र सुरक्षा रक्षक नेमण्याचा प्रस्ताव आहे.
यापूर्वीही झाली आहे दिव्यांची चोरी
1पूर्वमुक्त मार्गावर सुमारे ८०० मीटर लांबीचा व स्वतंत्र दुहेरी मार्गिका असणारा वाहतूक बोगदा आहे. या बोगद्यातील प्रकाश व्यवस्थेसाठी महापालिकेद्वारे विद्युत दिवे आणि विद्युत केबल बसविण्यात आली आहे. मात्र, आतापर्यंत अनेक वेळा हे दिवे चोरीला गेले आहेत. या वेळीस दिवे चोरून केबलही जाळण्यात आली आहे. त्यामुळे बोगद्यात अंधार पसरला असून, वाहनचालकांची प्रचंड गैरसोय होत आहे.
एलईडी दिवे बसवून होणार विजेची बचत
2यापूर्वी बोगद्यात केवळ ‘हाय पॉवर सोडियम वेपर’ या प्रकारचे दिवे होते. मात्र, आता पहिल्या टप्प्यात काही सोडियम वेपर दिव्यांसह ‘एलईडी’ प्रकारचे १२० दिवे बसविण्यात येणार आहेत. बोगदा दुहेरी मार्गिकेचा असल्याने ६० दिवे एका बाजूला, तर दुसºया बाजूला ६० दिवे बसविण्यात येणार आहेत. दुसºया टप्प्यात सर्व दिवे एलईडी प्रकारातील बसविण्याचे प्रस्तावित करण्यात आले आहे. यामुळे वीजखर्चातदेखील बचत होणे अपेक्षित आहे.आता केबल २० फूट उंचीवर
3बोगद्यात यापूर्वी असणाºया विद्युत केबल या जमिनीलगत चर खोदून बसविण्यात आल्या होत्या. मात्र, बोगद्यात वारंवार घडणाºया केबल चोरीच्या किंवा केबल जाळण्याच्या घटनांमुळे विद्युत केबल जमिनीपासून २० फूट उंचावर बसविण्यात येणार आहे.
बोगद्यावरील अतिक्रमणावर कारवाई
4बोगद्यावरील डोंगरावर असणाºया अतिक्रमणांवर कारवाई करण्यात आली आहे. ही जागा जिल्हाधिकाºयांच्या अखत्यारितील असल्याने, जिल्हाधिकारी कार्यालय व मुंबई पोलीस यांच्या सहकार्याने कारवाई करण्यात आली असल्याचे किलजे यांनी सांगितले.