Join us

आयआयएमसीसाठी बडनेरा येथे जमीन

By admin | Published: October 01, 2015 2:51 AM

केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या नियंत्रणाखालील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशनच्या अमरावती येथील विभागीय केंद्रासाठी अमरावती

मुंबई : केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या नियंत्रणाखालील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशनच्या अमरावती येथील विभागीय केंद्रासाठी अमरावती - बडनेरा येथे सहा हेक्टर शासकीय जमीन देण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.नवी दिल्ली येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मास कम्युनिकेशन ही केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयाने स्थापन केलेली पत्रकारिता आणि संपर्क माध्यमांचे शिक्षण देणारी देशातील एक अग्रगण्य स्वायत्त संस्था आहे. मुद्रण, फोटोग्राफी, रेडिओ, टेलिव्हिजन, जाहिरात, जनसंपर्क माध्यम आदी विषयांचे कौशल्य विकसित करण्यासाठी ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेचे विभागीय केंद्र २०११-१२ पासून संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या परिसरात तात्पुरत्या स्वरुपात सुरू आहे. या संस्थेस बडनेरा येथील सहा हेक्टर जमीन विनामुल्य देण्याची मागणी करण्यात आली होती. मात्र, अमरावती विभागीय आयुक्तांनी बडनेरा येथील सहा हेक्टर जमीन एक रूपये नाममात्र दराने ३० वर्षांसाठी भाडेपट्टीवर देण्याचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला. या प्रस्तावाला शासनाच्या नियम व अटीनुसार मंत्रिमंडळाने मान्यता दिली. या जमिनीचा ताबा मिळाल्यानंतर तीन वर्षांच्या आत बांधकामास सुरूवात करणे संबंधित संस्थेस बंधनकारक करण्यात आले आहे. (विशेष प्रतिनिधी)