घरांसाठी जमिनींचा शोध पूर्ण
By Admin | Published: October 19, 2015 02:22 AM2015-10-19T02:22:10+5:302015-10-19T02:22:10+5:30
बंद गिरण्यांच्या जमिनीवर गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना घर देणे अशक्य असल्याने, राज्य सरकारने मुंबई महानगर प्रदेशामध्ये घरे उभारण्यासाठी जमिनींचा शोध घेतला आहे
मुंबई : बंद गिरण्यांच्या जमिनीवर गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना घर देणे अशक्य असल्याने, राज्य सरकारने मुंबई महानगर प्रदेशामध्ये घरे उभारण्यासाठी जमिनींचा शोध घेतला आहे. शासनाने ४७६ हेक्टर जमिनींचा शोध घेण्यात आला असून, त्यावर गिरणी कामगार आणि सर्वसामान्यांसाठी घरे उभारण्यात येणार असल्याचे, गृहनिर्माणमंत्री प्रकाश महेता यांनी सांगितले.
मुंबईतील बंद पडलेल्या गिरण्यांच्या जागेवर गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांना घरे देण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. त्यानुसार, म्हाडामार्फत उभारण्यात आलेल्या घरांचा ताबा गिरणी कामगारांना दिला आहे. सर्व गिरणी कामगारांना मुंबईत घर देणे अशक्य असल्याने, राज्य शासनाने मुंबई महानगर प्रदेशामध्ये गिरणी कामगारांना घरे उपलब्ध करून देण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.
शासनाने म्हाडामार्फत ६ हजार ९२५ सदनिका गिरणी कामगारांना उपलब्ध करून दिल्या आहेत, तर दुसऱ्या टप्प्यात म्हाडामार्फत सहा गिरण्यांच्या जमिनीवर ६ हजार ७९४ घरे बांधण्यात येणार आहेत. तिसऱ्या टप्प्यात १0 गिरण्यांच्या जमिनीवर २ हजार ९११ घरे बांधण्यात येणार आहेत. वर्षाअखेरीस १0 हजार घरे गिरणी कामगारांना वितरित करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली आहे. सुमारे १७ हजार गिरणी कामगारांना
घरे दिल्यानंतर उर्वरित कामगारांनाही घरे उपलब्ध करून देण्यासाठी
राज्य शासनाने एमएमआर क्षेत्रामध्ये ४७६ हेक्टर जमिनींचा शोध घेतला आहे.