जमीन सरकारजमा होऊ नये, म्हणून मलिक यांना विकली का?; देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 07:26 AM2021-11-10T07:26:08+5:302021-11-10T08:01:03+5:30
खरेदीत काळा पैसा वापरला का?
मुंबई : सरदार शहावली खान आणि मोहम्मद सलीम इशाक पटेल ऊर्फ सलीम पटेल यांनी टाडा कायद्याअंतर्गत त्यांची जमीन सरकारजमा होऊ नये, म्हणून मलिक कुटुंबास विकली का? खरेदीत काळा पैसा वापरला गेला का?, असे सवाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी पत्रपरिषदेत केले.
हसीना पारकरला अटक झाली तेव्हा सलीम खानलादेखील अटक झाली. मुंबई पोलिसांचे रेकॉर्ड आपण पाहिले तर दाऊद फरार झाल्यानंतर त्यांची बहीण हसीना पारकर यांच्या नावाने वसुली करणारा सलीम पटेल होता. कुर्ल्यामध्ये एलबीएस रोडवर जवळपास २.८० एकर जागा आहे.
शहावली आणि सलीम पटेल यांनी ही जागा सॉलिडस कंपनीला ३० लाखांमध्ये विकली. त्यातील २० लाख रुपये दिले गेले. १५ रुपये चौरस फुटाने ही जागा कशी काय घेतली. आज त्याचे महिना १ कोटी रुपये भाडे सॉलिडसला मिळत आहे. सॉलिडस इन्व्हेस्टमेंट प्रा. लि. यांच्या वतीने फराज मलिकांनी सही केली होती. काही काळ स्वत: मंत्री नवाब मलिक हेसुद्धा संचालक होते.
आणखी चार प्रकरणे आहेत
नवाब मलिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या मालमत्ता खरेदीची पाच प्रकरणे आपल्याकडे आहेत. त्यातील चारबाबत मी खात्रीने सांगू शकतो की, त्यांचा अंडरवर्ल्डशी संबंध आहे. या चारही प्रकरणांची माहिती आपण तपास यंत्रणांकडे देणार असल्याचे फडणवीस म्हणाले.
मुख्यमंत्री असताना फडणवीसांना नवाब मलिक दिसले नाहीत का?
देवेंद्र फडणवीस हे ५ वर्षे मुख्यमंत्री असताना त्यांना नवाब मलिक यांच्या कुटुंबातील लोकांनी दाऊदच्या माणसाकडून संपत्ती घेतल्याची माहिती होती. तेव्हा त्यांनी का हे प्रकरण उचलले नाही किंवा कारवाई केली नाही. आज जेव्हा त्यांच्यावर आरोप झाले, तेव्हा ते लक्ष दुसऱ्या बाजूला वेधण्यासाठी हे सर्व बाहेर आणत असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर म्हणाले.
मलिकांच्या व्यवहारांची चौकशी करा : शेलार
देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जे फटाके फोडले त्यानंतर मंत्री नवाब मलिक यांना ते फटाके भिजलेले वाटले, पण त्यांचा चेहरा मात्र घामाने भिजलेला होता. चेहरा उतरलेला होता. त्यांनी सर्व आरोपांची कबुलीच पत्रकार परिषदेत दिली, असा प्रतिहल्ला भाजप नेते आ. आशिष शेलार यांनी चढवला.
फडणवीस यांचे तीन आरोप नवाब मलिक यांनी कबूल केले आणि हसीना पारकर या विषयात बोलण्याची हिंमत नसल्याने त्याबद्दल मौन राखून तो आरोप मौन धरून कबूल केला. मलिक यांची पत्रकार परिषद म्हणजे.. कबूल.. कबूल.. कबूल.. असा कबुलीनामा होता. मूळ आरोपांचे उत्तर देण्याची हिंमत नसल्याने त्यांनी बगल दिली. जमीन कवडीमोल दरात खरेदी कशी केली, याचे समाधानकारक उत्तर ते देऊ शकले नाही, असे शेलार म्हणाले.