मुंबईच्या समुद्रात पहिल्या जलवाहतूक विमानाच्या लँडिंगची झाली चाचणी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2017 04:03 PM2017-12-09T16:03:39+5:302017-12-09T16:06:25+5:30
मुंबईच्या समुद्रात पहिल्या जल वाहतूक विमानाच्या लँडिंगची चाचणी घेण्यात आली.
मुंबई- मुंबईच्या समुद्रात पहिल्या जल वाहतूक विमानाच्या लँडिंगची चाचणी घेण्यात आली. दोन घिरट्या घालून विमानाचं लँडिंग करण्यात आलं. मुंबईतील गिरगाव चौपाटीवर पार पडलेल्या या चाचणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व अशोक गजपती राजू, स्पाईसजेटचे अध्यक्ष अजय सिंग, जपानच्या सेतेयूची विमान कंपनीचे काजायुकी ओकाडा उपस्थित होते.
देशातील 111 नद्या आणि 7500 किमी समुद्री किनाऱ्यांचा वापर जल वाहतुकीसाठी करण्याचा केंद्रीय जल वाहतूक मंत्रालयाचा प्रयत्न आहे. त्यासाठी स्पाईसजेट या विमान कंपनीने पुढाकार घेतला आहे.जपानची सेतेऊची कंपनी अशी विमाने देते. या कंपनीच्या सहकार्याने स्पाईसजेट देशातील जल वाहतूक पर्यायांची तपासणी करीत आहे. याआधी नागपूर आणि गुवाहाटी येथे अशी चाचणी पार पडली. ही जलवाहतूक सध्या कॅनडा, अमेरिका आणि युरोपात सुरू आहे. तेथील नियमांचा अभ्यास करून भारतात तीन महिन्यांत तशी नियमावली तयार केली जाईल, असं नितीन गडकरी यांनी यावेळी म्हंटलं.
ही वाहतूक नेमकी कुठल्या मंत्रालयांअंतर्गत ठेवायची याचा अभ्यास केंद्र करीत आहे. देशातील सर्व नद्या, धरण क्षेत्र, समुद्री क्षेत्र, तलाव यांचा उपयोग करण्याचा सरकारचा विचार आहे.