मोबाईलच्या जमान्यातही लॅण्डलाईनची ‘ट्रिंग ट्रिंग’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:09 AM2021-09-04T04:09:57+5:302021-09-04T04:09:57+5:30

मुंबई : हल्ली मोबाईल हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. युवा पिढी तर दिवसातील निम्म्याहून अधिक काळ मोबाईलच्या ...

Landline's 'tring tring' even in the age of mobile | मोबाईलच्या जमान्यातही लॅण्डलाईनची ‘ट्रिंग ट्रिंग’

मोबाईलच्या जमान्यातही लॅण्डलाईनची ‘ट्रिंग ट्रिंग’

Next

मुंबई : हल्ली मोबाईल हा प्रत्येकाच्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. युवा पिढी तर दिवसातील निम्म्याहून अधिक काळ मोबाईलच्या सानिध्यातच घालवते. असे असले तरी मोबाईलच्या जमान्यात लॅण्डलाईनची ‘ट्रिंग ट्रिंग’ कायम आहे. मुंबईत जवळपास ३० लाखांहून अधिक लॅण्डलाईन ग्राहक आहेत.

मोबाईलच्या आगमनापूर्वी लॅण्डलाईन फोन हे संपर्काचे सर्वात जलद माध्यम म्हणून ओळखले जाई. गावात किंवा गल्लीत लॅण्डलाईन असलेल्यांचा रुबाब मोठा असायचा. सुरुवातीच्या काळात तर हा फोन कसा दिसतो, हे पाहण्यासाठीही माणसांची गर्दी जमायची. गेल्या २० वर्षांत मात्र हे चित्र पूर्णतः पालटले आहे. लॅण्डलाईनची जागा आता स्मार्टफोनने घेतली आहे. आपण जाऊ तिथे हे यंत्र घेऊन जाता येत असल्याने काळानुरूप लॅण्डलाईन मागे पडत चालल्याचे चित्र आहे. सध्या कार्यालये आणि उच्चभ्रू वसाहतींतच लॅण्डलाईन सेवेचा वापर होताना दिसतो.

...........

३० लाखांहून अधिक लॅण्डलाईन

लॅण्डलाईन वापरकर्त्यांच्या संख्येत दिल्लीनंतर मुंबईचा क्रमांक लागतो. असे असले तरी गेल्या काही वर्षांत लॅण्डलाईन ग्राहकांच्या संख्येत सातत्याने घट होताना दिसत आहे. आजमितीस मुंबईत ३० लाख ४९ हजार ११५ लॅण्डलाईनधारक आहेत. तर महाराष्ट्र सर्कलमध्ये १३ लाख ६० हजार ५९४ ग्राहकांकडे लॅण्डलाईन आहे.

.............

प्रतिसाद कमीच

मी गेल्या १५ वर्षांपासून पीसीओ चालवतो. २०१०पर्यंत ग्राहकांच्या रांगा लागायच्या. संध्याकाळी ६ नंतर तर फोनवर बोलायची वेळमर्यादा ठरवावी लागत होती, इतकी गर्दी असायची. आता मात्र मोबाईलचे प्रस्थ वाढल्यामुळे ग्राहक संख्या रोडावली आहे. क्वचित कुणीतरी परप्रांतीय मजूर वा मोबाईलला नेटवर्क नसल्यास सामान्य माणूस येतो.

- मंदार फोपळे, पीसीओ चालक

...............

म्हणून लॅण्डलाईन आवश्यकच

आमच्याकडे फार पूर्वीपासून लॅण्डलाईन आहे. घरातील प्रत्येकाकडे मोबाईल आहे. मात्र, वयोवृद्ध आई-वडिलांना त्याचा वापर करता येत नसल्याने लॅण्डलाईन सोयीस्कर ठरतो. शिवाय एमटीएनएलकडून चांगले पॅकेज दिले जात असल्याने परवडण्यासारखाही आहे.

- सदाशिव देसाई, लॅण्डलाईन ग्राहक

.....

इंटरनेट केबल आणि लॅण्डलाईनचे पॅकेज एकत्र मिळत असल्यामुळे आम्ही लॅण्डलाईन जोडणी कायम ठेवली आहे. बऱ्याचदा घरात मोबाईलला नेटवर्क मिळत नाही. अशावेळी लॅण्डलाईनची खूप मदत होते.

- प्रमोद नाईक, लॅण्डलाईन ग्राहक

Web Title: Landline's 'tring tring' even in the age of mobile

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.