Join us

भूखंड जाणार भूमाफियाच्या घशात

By admin | Published: March 16, 2015 1:59 AM

शहरातील कॅम्प नं-५ मधील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भूखंडावर मातीचा अवैध भराव टाकणे सुरू असूून भूखंड हडप करण्याचा डाव त्यामागे आहे.

सदानंद नाईक, उल्हासनगरशहरातील कॅम्प नं-५ मधील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या भूखंडावर मातीचा अवैध भराव टाकणे सुरू असूून भूखंड हडप करण्याचा डाव त्यामागे आहे. गेल्या दोन वर्षांपूर्वी जीवन प्राधिकरणाने पोलिसात तक्रार दाखल करून या प्रकाराला अटकाव केला होता. उल्हासनगरातील जीवन प्राधिकरण विभागाची खुली जागा व इतर मालमत्ता पालिकेला हस्तांतरित झाले असून आनंदनगर व नेताजी चौकातील विभागाच्या जागेवर भूमिगत व दोन उंच जलकुंभ उभारले आहे. तसेच नेताजी व भाटिया चौकासह इतर मालमत्ता पालिकेकडे हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. आनंदनगर, कॅम्प नं-५, कुर्ला कॅम्प विभागात जीवन प्राधिकरण विभागाचे निवासी बंगले व खुले मैदान आहे. प्राधिकरणाच्या खुल्या जागेवर भूमाफियाची नजर गेली असून दोन वर्षांपासून जागेवर मातीचा भराव टाकण्याचा प्रकार झाला आहे. माजी उपमहापौर विनोद ठाकूर व स्वाभिमान संघटनेचे रोहित साळवे यांनी याबाबत विभागाशी पत्रव्यवहार केल्यावर विभागाने पोलीस ठाण्यात धाव घेतली होती. त्यामुळे मैदानात मातीचा भराव टाकणे बंद झाले होते. कालांतराने पुन्हा मातीचा भराव टाकण्यात येत असून भूखंड परस्पर नावे केल्याची चर्चा होत आहे.भाटिया चौक, नेताजी चौक, आनंदनगर, कुर्ला कॅम्प परिसरासह शहरात इतर ठिकाणी जीवन प्राधिकरण विभागाची निवासस्थाने व खुली जागा आहे. नेताजी चौकातील निवासस्थानात विभागाचे कर्मचारी राहत असून आनंदनगर, कुर्ला कॅम्प या परिसरातील निवासस्थाने ओस पडली आहेत. भाटिया चौकातील एका बंगल्यावर यापूर्वीच अतिक्रमण झाले आहे. एक एकराच्या खुल्या जागेवर भरदिवसा मातीचा भराव टाकणे सुरू असून भूमाफिया जागा हडप करीत आहे.