Join us

वांद्र्यातील जमिनीला भाडेकरू मिळेना; प़ रेल्वेचे प्रकल्प रखडले ?

By admin | Published: July 28, 2014 1:44 AM

तब्बल चार हजार कोटी रुपये किंमत असलेल्या वांद्र्यातील रेल्वेच्या जमिनीला अद्यापही भाडेकरू मिळालेला नाही.

मुंबई : तब्बल चार हजार कोटी रुपये किंमत असलेल्या वांद्र्यातील रेल्वेच्या जमिनीला अद्यापही भाडेकरू मिळालेला नाही. त्यामुळे जूनमध्ये काढलेली निविदा पुन्हा काढण्याचा निर्णय पश्चिम रेल्वेने घेतला आहे. ही जमीन भाडेतत्त्वावर दिल्यास मिळणाऱ्या पैशांतून रेल्वेचे अनेक प्रकल्प मार्गी लागण्यास मदत होणार असल्याचे सांगण्यात येते.भाडेतत्त्वावर जागा देतानाच त्याची तब्बल चार हजार कोटी रुपये किंमत पश्चिम रेल्वेने ठरवलेली आहे. ही जागा साधारण ४0 वर्षांसाठी भाडेतत्त्वावर देण्यात येणार असून, त्यासाठी जून महिन्यात निविदाही काढली होती. मात्र महिनाभर वाट पाहूनही या जागेसाठी कुणीही रुची दाखवलेली नाही. आता पुन्हा निविदा काढणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शरत चंद्रायन यांनी सांगितले. ही जागा बरीच मोठी आहे. त्यामुळे ही जागा दोन भागांत विभागून त्याची निविदा काढता येऊ शकते का, याचा विचार आम्ही करीत असल्याचेही ते म्हणाले. तसेच भाड्याचा निश्चित कालावधीही कमी करता येऊ शकतो का याचा शोध सुरू आहे. ही जागा भाड्याने गेल्यास मिळणाऱ्या रकमेतून मुंबईत सुरू असलेले अनेक प्रकल्प मार्गी लागू शकतात, असेही चंद्रायन म्हणाले.