भाषेच्या संवर्धनाची सुरुवात घरातून व्हावी!
By admin | Published: June 20, 2017 05:50 AM2017-06-20T05:50:54+5:302017-06-20T05:50:54+5:30
उर्दू व अन्य भारतीय भाषांना ऐतिहासिक वारसा आहे. मात्र, त्याचा होत असलेला ऱ्हास टाळून, त्या भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने स्वीकारली पाहिजे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : उर्दू व अन्य भारतीय भाषांना ऐतिहासिक वारसा आहे. मात्र, त्याचा होत असलेला ऱ्हास टाळून, त्या भाषेच्या संवर्धनाची जबाबदारी प्रत्येक नागरिकाने स्वीकारली पाहिजे. त्यासाठी सरकारवर विसंबून न राहाता, प्रत्येकाने घरातून जोपासण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी केले.
‘पासबान अदाब’ या संस्थेच्या वतीने ‘इजहार’ हा आंतरराष्ट्रीय कवी महोत्सव नुकताच उत्साहात साजरा झाला. ‘उर्दू भाषेची सद्यस्थिती या विषयावरील परिसंवादामध्ये ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. या वेळी जावेद अख्तर म्हणाले, ‘भाषा ही कोणत्याही धर्माची नव्हे, तर क्षेत्राची असते. १७०० व्या शतकात भारतात उदयाला आलेली उर्दू भाषाही देशाच्या संवादाची भाषा म्हणून पुढे आली होती. मात्र, काळाच्या ओघात परदेशी भाषेचे आक्रमण झाल्यानंतर, अन्य देशी भाषांबरोबर उर्दूचाही ऱ्हास होऊ लागला. त्याला पुन्हा प्रवाहित करण्यासाठी सरकारी कार्यालये, उच्च शिक्षणामध्ये त्याचा वापर होण्याची गरज आहे. त्याचबरोबर, प्रत्येक नागरिकाने नव्या पिढीला या भाषेची माहिती घरातून दिली गेली पाहिजे.
तर शमीम हनफी म्हणाले, ‘उर्दू भाषेने संवादाची भाषा म्हणून सुवर्णकाळ पाहिला आहे. खानपान, वेशभूषेपासून ते देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात उर्दूचा मोठा प्रभाव आहे. १९०६ मध्ये हसद मुबानी यांनी ब्रिटिशांविरुद्ध उठावासाठी पहिल्यांदा ‘इन्कलाब झिंदाबाद’ ही आजरामर घोषणा दिली होती.’ सुमारे तीन तास रंगलेल्या कार्यक्रमाचे संयोजन संस्थेचे अध्यक्ष कैसर खलीद, सहसचिव हुमायून कबीर आदींनी केले.