Join us

निबंध स्पर्धेची भाषा मराठी, इंग्रजी विषय मात्र हिंदी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2020 7:00 PM

गंदगी मुक्त भारत अभियान मोहीम राबविण्याचा शिक्षण विभागाकडून केवळ फार्स

केवळ २ दिवस आधी सूचना देऊन ऑनलाईन स्पर्धा कशी आयोजित करावी शाळांपुढे प्रश्नचिन्हमुंबई : देशभरात सध्या केंद्र सरकारकडून स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ‘गंदगी मुक्त अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत नुकत्याच शालेय शिक्षण विभागाकडून शाळा मुख्याध्यापकांना या अभियानाअंतर्गत उपक्रम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. अभियानाअंतर्गत निबंध स्पर्धेचे आयोजन मराठी व इंग्रजी भाषेतून करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून करण्यात आल्या असल्या तरी विषय मात्र हिंदी ठेवला आहे. गंदगी मुक्त मेरा गांव या विषयावर ही स्पर्धा आयोजित करण्याच्या सूचना प्राचार्य व मुख्याध्यापकांना देण्यात आल्याने ते गोंधळले आहेत. निबंध स्पर्धेचा विषय भाषेप्रमाणे बदलल्यास त्याचा उद्देश बदलत नसतो. मात्र  विषय हिंदी आणि निबंध स्पर्धेची भाषा हिंदी , इंग्रजी या शिक्षण विभागाच्या अजब सूचनेमुळे हे नियोजन केंद्राच्या सूचनांचे पालन करण्यासाठी आहे की विद्यार्थ्यांमधील जागृतीसाठी यावर शिक्षकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.केंद्र सरकारच्या मनुष्यबळ विकास मंत्रालय, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागातर्फे ‘गंदगी मुक्त अभियान’ अंतर्गत ८ ते १५ ऑगस्टदरम्यान स्वच्छता अभियानासाठी विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. या निमित्ताने इयत्ता सहावी ते आठवीसाठी १३ ऑगस्टला ‘गंदगी मुक्त मेरा गाव’ या विषयावर ऑनलाईन चित्रकला तर इयत्ता नववी व दहावीसाठी ऑनलाईन निबंध स्पर्धा घेण्याचे परिपत्रक शिक्षण निरीक्षक कार्यालयाकडून काढण्यात आले आहे. मुळातच  या अभियानासंदर्भातील परिपत्रक शिक्षण निरीक्षक कार्यालयाकडून चक्क १३ ऑगस्टला काढत शाळा प्रशासनांना तातडीने अभियान राबवण्याचे आदेश दिले आहेत. मराठी, हिंदी व इंग्रजी माध्यमातून सहभागी होणार्‍या विद्यार्थ्यांमधून प्रत्येकी तीन क्रमांक काढून चित्र व निबंध शिक्षण निरीक्षक कार्यालयाला १९ ऑगस्टपर्यंत पाठवायचे आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना स्पर्धेसाठी तयार करणे, स्पर्धेचे नियोजन करणे, स्पर्धा घेणे आणि निकाल लावणे ही तारेवरची कसरत करण्यासाठी शाळांना फक्त दोन दिवस मिळाले आहेत. त्यामुळे कोरोना काळात दोन दिवसांत ही स्पर्धा कशी घ्यायची असा प्रश्न शिक्षकांसमोर निर्माण झाला आहे.केंद्र सरकारकडून दरवर्षी स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष अभियान राबवण्यात येते. त्याची माहिती शाळास्तरावर शेवटच्या क्षणाला पोहचत असल्याचे कार्यक्रम करण्यासाठी शिक्षक व शाळा प्रशासनांला तारेवरची कसरत करावी लागते. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन स्पर्धा आयोजित करणे सहज शक्य होते. परंतु नियोजन करुन पत्र पाठवले असते तर वेळेवर काम करता आले असते. निदान या पुढे शिक्षण विभागाने परिपत्रक वेळेवर पाठवणे आवश्यक असल्याची अपेक्षा शिक्षकांकडून व्यक्त करण्यात आली. 

ऑनलाईन स्पर्धेच्या नियोजनासाठी केवळ २ दिवस देणे आणि केवळ टाय दरम्यान स्पर्धा उरकून निकाल लावणे यामधून मोहिमेतून अपेक्षित मूल्यांची रुजवण विद्यार्थ्यांमध्ये कशी शक्य आहे ? हे केवळ केंद्राच्या सूचनांचे पालन करण्यासाठीचा फार्स ठरत आहे. शिवाय पत्रक मराठीमध्ये व विषय हिंदीमधून देताना साधारण बदल अपेक्षित होते, ते ही शिक्षण विभागाकाडून करण्यात येत नसतील तर कठीण आहे.– उदय नरे, शिक्षक, हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल, अंधेरी  

 

टॅग्स :शिक्षणमराठी