संत मीराबाईंची भाषा शब्दाची नव्हे, तर समर्पणाची
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 02:09 AM2019-05-03T02:09:22+5:302019-05-03T02:09:45+5:30
माणिक मुंडे : ‘मीरा - भक्ती का अमिरस’ आणि ‘हंस का दंश’ या ग्रंथांचे प्रकाशन
मुंबई : संत मीराबाईची भाषा ही शब्दाची नाही, गणिताची नाही, तर्काची नाही, तर ती प्रेमाची, भाव आणि समर्पणाची भाषा होती, असे विवेचन ‘मीरा - भक्ती का अमिरस’ या ग्रंथाचे लेखक माणिक मुंडे यांनी केले. कालजयी प्रकाशनतर्फे मुलुंड येथे ट्रान्सकॉन स्कायसिटी येथे झालेल्या प्रकाशन सोहळ्यात ‘मीरा - भक्ती का अमिरस’ आणि ‘हंस का दंश’ या ग्रंथांचे प्रकाशन महामंडलेश्वर श्री स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी आणि संत श्री रमेशभाई ओझा यांच्या हस्ते झाले. ‘लोकमत’ या कार्यक्रमाचे माध्यम प्रायोजक होते.
हृदयाची स्पंदने ओळखली तर शब्दाची गरज नाही. भावतरंग पकडले आणि तादात्म झालो तर त्यापुढे शब्दही व्यर्थ ठरतात. बुद्ध आणि मीरा यांच्यात आपल्याला विरोधाभास दिसतो. कारण आपली दृष्टी विभाजित झालेली असते, असेही प्रतिपादन मुंडे यांनी केले.
मीरासारखे समर्पण हे कुणालाच शक्य नाही. तिने कन्हैयाचा ध्यास सोडावा, यासाठी अनेक अघोरी प्रयत्न झाले. पण तिने कुणालाच दाद दिली नाही इतकी ती समर्पित होती. असे उदाहरण विरळच. पूर्ण विश्वात तिच्या भक्तीचा महिमा अगाध आहे, असे संत रमेशभाई ओझा यांनी निरूपण करताना म्हटले.
मीराच्या जीवनात एक दर्द आहे. तिच्यात अनंताचा महासागर आहे. ब्रह्मस्वरूप मीरा त्यात डुंबली. तिच्या जीवन चरित्रातून प्रेमाची धारा वाहिली. हे सारे मीरा - भक्ती का अमिरस हा ग्रंथ वाचताना पानोपानी जाणवते, असे महामंडेश्वर स्वामी विश्वेश्वरानंद गिरीजी या वेळी म्हणाले.
‘हंस का दंश’ या ग्रंथाबाबत ते म्हणाले, हंसांचा दंश झाल्याचे कधी कुणाला दिसले नाही. दंश झाले त्यांनी कधी आपल्या वेदना प्रकट केल्या नाहीत. दंश झाल्यानंतरही आनंदरस देतात ते खरे संत, अशी व्याख्याही विश्वेश्वरानंद स्वामींनी स्पष्ट केली. या वेळी डॉ. डी.वाय. पाटील, बॉम्बे स्टॉक एक्स्चेंजचे व्यवस्थापकीय संचालक आणि सीईओ आशिष चौहान, आहारवेदाचे हरीश शेट्टी आणि इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स फॉर अफर्मेटिव्ह अॅक्शनचे अध्यक्ष सुनील झोडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.