मुंबई : मातृभाषेच्या वापरातच पारदर्शी लोकशाहीची बीजे असल्याचे सांगत मराठी अभ्यास केंद्राचे दीपक पवार यांनी मत व्यक्त केले. सोबतच आपल्या भागात आपला नगरसेवक करत असलेल्या कामाबाबत नागरिकांनी प्रश्न तर विचारलेच पाहिजेत, पण हे प्रश्न विचारताना संबंधित नगरसेवकाशी थेट संवादही साधला पाहिजे, असे मत प्रवीण महाजन यांनी व्यक्त केले. मराठी अभ्यास केंद्राच्या सोशल सर्व्हिस लीग सभागृह, परळ येथे महाराष्ट्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मराठी अभ्यास केंद्राकडून महाराष्ट्र दिनानिमित्त प्रबोधनपर सत्रांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात मराठी अभ्यास केंद्र आणि मुंबई विद्यापीठातील संज्ञापन आणि पत्रकारिता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या ‘माहिती अधिकाराद्वारे नगरसेवकाचे मूल्यमापन’ प्रकल्पातून सिद्ध झालेल्या ‘माझा प्रभाग - माझा नगरसेवक’ ही १९ अहवालांची अहवाल मालिका प्रकाशित करण्यात आली. प्रजा फाउंडेशनचे मिलिंद म्हस्के यांनी नगरसेवकांचे असे मूल्यमापन सामान्य नागरिकांद्वारे होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले तर माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी नगरसेवकांच्या अशा प्रकारच्या पारदर्शी मूल्यमापनामागे असलेले माहिती अधिकाराचे पाठबळ अधोरिखित केले. मराठी अभ्यास केंद्राचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार यांनी भाषेचे कार्य विशुद्ध साहित्यापुरते मर्यादित ठेवल्याने मराठी भाषेची आजवर हानी होत आलेली आहे. लोकांच्या मातृभाषेतून राज्यकारभार हाकल्यानेच पारदर्शी लोकशाही अमलात येऊ शकेल, असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात कोरा मराठीचे समुदाय व्यवस्थापक प्रशांत ननावरे यांनी कोरा मराठीच्या व्यासपीठावर जागतिक ज्ञानाची देवाणघेवाण मराठी भाषेत कशी केली जाते तसेच कोरा मराठीअंतर्गत आपले योगदान आपण कसे वाढवू शकतो याविषयीचे सादरीकरण केले.
मराठीच्या पिछेहाटीला आपणच जबाबदारतिसऱ्या सत्रात उच्चशिक्षणात मराठीमधून ‘विज्ञान व तंत्रज्ञान’ या विषयावर बोलताना संगणकतज्ज्ञ डॉ. अभिजात विचारे यांनी मराठीतील तांत्रिक शब्द आणि त्याच अर्थाचे इंग्रजी शब्द यातील फरक समजावून सांगितला. उच्चशिक्षणातील मराठीच्या पिछेहाटीला आपणच जबाबदार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.