बाळकुमच्या पोटनिवडणुकीला हिरवा कंदील
By admin | Published: March 13, 2016 04:35 AM2016-03-13T04:35:08+5:302016-03-13T04:35:08+5:30
ठाणे येथील बाळकुम विभागातील पोटनिवडणुकीला स्थगिती द्यावी, अशी मागणी अपात्र नगरसेवक लॉरेन्स डिसोझा यांनी उच्च न्यायालयाकडे केली होती.
मुंबई : ठाणे येथील बाळकुम विभागातील पोटनिवडणुकीला स्थगिती द्यावी, अशी मागणी अपात्र नगरसेवक लॉरेन्स डिसोझा यांनी उच्च न्यायालयाकडे केली होती. मात्र, बनावट कागदपत्रांच्या आधारे जात वैधता प्रमाणपत्र तयार केल्याने, उच्च न्यायालयाने डिसोझा यांना दिलासा देण्यास नकार दिला, तसेच बाळकुमच्या पोटनिवडणुकीला स्थगिती देण्यासही नकार दिला.
शिवसेनेचे नगरसेवक लॉरेन्स डिसोझा यांचे जात प्रमाणपत्र जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीने अवैध ठरवल्यानंतर ठाणे महापालिकेने त्यांना ९ फेब्रुवारी २०१६ रोजी अपात्र ठरवले. या निर्णयाला डिसोझा यांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यांच्या याचिकेवरील सुनावणी न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. ए. ए. सय्यद यांच्या खंडपीठापुढे होती.
२०१२ मध्ये ठामपाच्या निवडणुकीत डिसोझा यांच्यामुळे पराभूत झालेले राष्ट्रवादीचे देवराम भोईर यांनी डिसोझा यांच्याविरुद्ध विभागीय जात पडताळणी समितीकडे तक्रार केली.
भोईर यांनी केलेल्या तक्रारीनुसार, डिसोझा ख्रिश्चन असून, त्यांनी मागास प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या विभागातून निवडणूक लढवता यावी, यासाठी नातेवाईकांच्या मदतीने व शाळेच्या मुख्याध्यापकांना फसवून, त्यांची जात ईस्ट इंडियन ख्रिश्चन अशी दाखवली आहे.
भोईर यांच्या तक्रारीनंतर जात पडताळणी समितीने डिसोझा यांना नोटीस बजावून सुनावणीसाठी बोलावले. समितीपुढे डिसोझा आपली बाजू योग्य आहे, हे सिद्ध
न करू शकल्याने, जात पडताळणी समितीने त्यांचे जात वैधता
प्रमाणपत्र अवैध ठरवले. त्यामुळे ठामपानेही त्यांना नोटीस बजावून अपात्र ठरवले, तसेच निवडणूक आयोगानेही निवडणूक प्रक्रिया सुरू केली. (प्रतिनिधी)