Join us

शिवाजी पार्कमध्ये पेटला ‘कंदील’ वाद; मनसेच्या कंदिलांसह फलकांवर कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 02, 2019 1:22 AM

मनसेचे संदीप देशपांडे यांना न्यायालयीन कोठडी

मुंबई : दादर पश्चिम येथील शिवाजी पार्क परिसरात लावलेले राजकीय पक्षांचे कंदील, शुभेच्छांचे फलक महापालिकेच्या जी उत्तर विभागाने शुक्रवारी खाली उतरवले. मात्र केवळ मनसेच्या फलक आणि कंदिलांवर ही कारवाई केली जात असल्याचा आरोप करीत मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पालिका अधिकाऱ्यांशी हुज्जत घालून त्यांना शिवीगाळ केली. या प्रकरणी मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांना अटक करण्यात आली. त्यांचा जामीन फेटाळत भोईवाडा न्यायालयाने त्यांना १४ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

शिवाजी पार्क परिसरात दिवाळीनिमित्त सर्वच राजकीय पक्षांमार्फत कंदील व फलक लावण्यात आले होते. हे कंदील तुळशीच्या लग्नानंतर काढले जातात. परंतु अनधिकृतपणे हे कंदील लावण्यात आल्याचे सांगत पालिकेकडून मनसेचे कंदील खाली उतरविण्यात आले. या कारवाईची पाहणी करण्यासाठी चैत्यभूमी परिसरात जी उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर गेले होते. मात्र त्या ठिकाणी मनसे कार्यकर्ते एकत्र येऊन त्यांना जाब विचारू लागले.

‘आमच्या पक्षाचे कंदील व झेंडे काढायचे थांबवा, शिवसेनेचे फलक आणि कंदील दिसत नाहीत का?’ असा सवाल करीत संदीप देशपांडे यांनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केल्याची तक्रार दिघावकर यांनी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात दाखल केली. बराच काळ रंगलेल्या या वादावरील व्हिडीओदेखील सोशल मीडियावरून वायरल करण्यात आला. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी तक्रारही अधिकाऱ्यांनी दिली. त्यानुसार पोलिसांनी संदीप देशपांडे आणि मनसेच्या काही कार्यकर्त्यांना ताब्यात घेत भोईवाडा न्यायालयापुढे हजर केले.

भोईवाडा न्यायालयाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर जामीनीसाठीचा अर्ज फेटाळला व त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनाविण्यात आली आहे. यामुळे शिवाजी पार्क परिसरात शिवसेना-मनसे पुन्हा एकदा आमने-सामने येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :शिवसेनामनसे