- राज चिंचणकर मुंबई : दिवाळीचा अविभाज्य भाग म्हणजे आकाशकंदील! दिव्यांच्या या सणाला दारावर कंदील हवाच असतो. मुंबईच्या विविध बाजारपेठांमध्ये कंदील विक्री होत असली, तरी माहीमच्या कंदील गल्लीला मात्र पर्याय नाही. मुंबई आणि मुंबईच्या आसपासच्या परिसरातून आकाशकंदील घेण्यासाठी ग्राहकवर्ग माहीमकडे हटकून वळतो. विविध प्रकारचे आकर्षक कंदील ही या गल्लीची खासियत असल्याने, येथून कंदील घेण्यासाठी ग्राहकांची झुंबड उडते.
यंदाही हेच चित्र माहीमच्या कंदील गल्लीत दिसून येत आहे. दिवाळीच्या साधारण ८-१० दिवस आधीपासून माहीमच्या एल. जे. मार्गावर कंदिलांची दिवाळी साजरी होत असते. 'कंदील गल्ली' म्हणूनच ओळखल्या जाणाऱ्या या गल्लीत तयार केलेले विविध प्रकारचे आकाशकंदील या ठिकाणी टांगले जातात आणि इथल्या कंदिलांच्या दिवाळीला खऱ्या अर्थाने प्रारंभ होतो.
पूर्ण दिवसभर, अगदी रात्रीपर्यंत या मार्गावर मोठ्या उत्साहाने कंदील विक्री होते. पारंपरिक कंदिलांपासून आधुनिक कंदिलांची मोठी बाजारपेठ म्हणून माहीमच्या कंदील गल्लीचे स्थान अबाधित आहे. यंदा किंमतीत १० ते २० टक्के वाढ झाली असली, तरी ग्राहकवर्ग हात आखाडता घेत नसल्याचे चित्र आहे. यंदा काही विक्रेत्यांनी दरवर्षीपेक्षा कमी कंदील तयार केले असले, तरी कंदील गल्ली मात्र उत्साहाने सजलेली आहे.