लॅमिंग्टन रोडवरील घटना
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : गेल्या दीड वर्षापासून मुंबई शहर, उपनगर कोरोनाशी दोन हात करत आहे. कोरोनाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये माणसे घरात कैद झाली असली तरी माणुसकीचे दर्शन मात्र अनेक ठिकाणी घडत आहे. अशाच प्रकारे मंगळवारी सकाळी दक्षिण मुंबईतल्या लॅमिंग्टन रोडवर लॅपटॉप दुरुस्त करणाऱ्या मुंबईकर नागरिकाने एका वृद्ध केळीवाल्याचा जीव वाचवून मुंबईकरांमधल्या माणुसकीचे नव्याने दर्शन घडविले.
ग्रँट रोड येथील लॅमिंग्टन रोडवरील पोलीस ठाण्याच्या परिसरात नमोनम: संस्थेचे विक्रम कांबळे हे मंगळवारी सकाळी काही कामानिमित्त गेले होते. ते लॅपटाॅप दुरुस्तीचे काम करतात. या वेळी येथील एका कोपऱ्यात केळी विकण्यासाठी बसलेले अंदाजे साठ वर्षांचे, किरकाेळ शरीरयष्टीचे वृद्ध गृहस्थ अस्वस्थ असल्याचे त्यांच्या नजरेस पडले. त्यांना दम लागला हाेता. अनेकांनी त्यांची ही अवस्था पाहिली. मात्र काेणीच त्यांना हात लावायला तयार नव्हते. कांबळे यांनी तत्काळ रुग्णवाहिकेला फाेन केला आणि त्यानुसार आलेल्या रुग्णवाहिकेने अस्वस्थ झालेल्या केळीवाल्याला स्थानिक रुग्णालयात हलविले, असे कांबळे यांनी सांगितले. त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून, त्यांची प्रकृती आता स्थिर आहे. सहा महिन्यांपूर्वीदेखील त्यांना असाच त्रास झाला होता. तेव्हाही आम्ही त्यांना अशीच मदत केल्याचे कांबळे यांनी सांगितले.
...................................