- पंकज रोडेकर, ठाणेफेसबुक माध्यमातून जुने मित्र मंडळी जशी शोधली जातात. तशीच किमया करून ठाणे रेल्वे स्थानक प्रबंधकानी फेसबुकच्या मदतीने चक्क लोकलमध्ये विसरलेल्या लॅपटॉप मालकिणीचा शोध घेऊन तो लॅपटॉप अवघ्या दहा दिवसात त्यांच्या स्वाधीन केला. बुधवारी १ मार्चला दुपारी १२.३० च्या सुमारास ठाणे रेल्वे स्थानकात एक लोकल आली. महिला डब्यातील एका दक्ष प्रवासी महिलेने डब्यात बेवारस बॅग असल्याची माहिती स्थानकातील प्रबंधक कार्यालयात दिली. त्यानुसार, बॅगेची तपासणी केल्यावर त्यामध्ये लॅपटॉप आढळला. दरम्यान, ठाणे स्थानक प्रबंधक एस.बी महीदर यांनी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यांपासून डोंबिवली-कल्याण इतर सर्व लोहमार्ग पोलीस ठाण्यात लॅपटॉप हरवल्याची तक्रार आली आहे का अशी विचारणा केली. १ मार्चला अशी कोणतीच तक्रार आली नसल्याचे रेल्वे पोलिसांनी त्यांना सांगितले. अखेर त्यांनी लॅपटॉप उघडून तो कोणाचा आहे. याबाबत काही माहिती मिळते का याची चाचपणी केली. त्यावेळी, प्रिया (नाव बदलले आहे) असे नाव पुढे आले. बाकी इतर फाईल्स लॉक असल्याने रेल्वे प्रबंधकांनी संगणक तज्ज्ञांची मदत घेतली. त्यांच्या हाती एक फोटो लागला. त्यानुसार, लॅपटॉप मालकाचा शोध सुरु झाला. यासाठी सोशल मिडीयाचा आधार घेत हाती आलेल्या माहितीच्या आधारे फेसबुकवर सर्चिंग करायला सुरुवात केली. फोटो आणि नावाची जुळवा-जुळव झाल्यावर त्यावर संदेश पाठवला. आणि दुसऱ्याच दिवशी प्रतिसाद आल्यावर त्यांना सर्व काही जिंकल्यासारखे वाटले. तसेच शुक्रवारी तो लॅपटॉप कल्याणमधील संबंधित तरुणीला परतही केला. या शोध कार्यात स्थानक उपप्रबंधक ए.के.श्रीवास्तव आणि अनिकेत आढाव यांनी मदत केली. आता लोक जागृत झाल्याने तो लॅपटॉप कोणी परस्पर न नेता, त्याबाबत माहिती दिली. त्यानंतर ज्याचा लॅपटॉप आहे. त्याचा शोध सुरु झाला आणि तो परत केल्याचा आनंद आहे. - एस.बी. महीदर, स्थानक प्रबंधक ठाणे रेल्वेलॅपटॉप हरवल्यानंतर तत्काळ रेल्वे हेल्पलाईनवर संपर्क केला. गेलेली वस्तू परत मिळत नसल्याने आशा सोडून दिली होती. तो अशाप्रकारे मिळेल, असे वाटलेही नव्हते. तो मिळाल्याचा खूप खूप आनंद झाला आहे. - प्रिया
फेसबुकमुळे परत मिळाला लॅपटॉप
By admin | Published: March 11, 2017 2:32 AM