लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : प्राप्तिकर विभागाच्या रडारवर असलेल्या सोनू सूदने परदेशी योगदान नियमन कायद्याचे (एफसीआरए) उल्लंघन केल्याची माहिती प्राप्तिकर विभागाच्या प्राथमिक चौकशीतून समोर येत असल्याचे सूत्रांकडून समजते. याप्रकरणी शुक्रवारी सलग तिसऱ्या दिवशीही सोनू सूदच्या घरी प्राप्तिकर विभागाची झाडाझडती सुरू होती. सोनू सूद संबंधित ३०हून अधिक ठिकाणी प्राप्तिकर विभागाने छापेमारी केली आहे.
आतापर्यंत झडतीत जप्त केलेल्या कागदपत्रांतील पुराव्यांमधून मोठ्या प्रमाणात परदेशातून फंडिंग झाल्याचे समोर आले. परदेशातून आलेले फंडिंगचे पैसे विविध गोष्टींसाठी खर्च केल्याचे दिसून आले असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यादरम्यान मोठ्या प्रमाणात करचोरीची माहितीही प्राप्तिकर विभागाच्या हाती लागल्याचे समजते आहे. प्राप्तिकर अधिकाऱ्यांना सोनूच्या हिशेबात मोठ्या प्रमाणात हेराफेरी सापडली आहे. हा व्यवहार बॉलिवूड आणि सोनू सूदच्या वैयक्तिक आर्थिक व्यवहाराशी संबंधित आहे. ‘सूद चॅरिटी फाउंडेशन’च्या खात्यांचीही आता चौकशी केली जात आहे. तसेच बोगस कर्ज, बिलासंबंधित कागदपत्रेही प्राप्तिकर विभागाच्या हाती लागल्याचे समजते आहे. ही सर्व कागदपत्रे प्राप्तिकर विभागाच्या ताब्यात आहेत.