मुंबई - विदर्भात मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरात भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्यात मोठं नुकसान झालं आहे. भंडारा जिल्ह्यातील 58 गावातील तब्बल 2646 कुटुंब पूर बाधित झाले आहेत. प्रशासनाच्या वतीने मदत व बचाव कार्य युद्धस्तरावर सुरू असून जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी आज दिवसभर पूरग्रस्त भागाला भेटी देऊन पाहणी केली. विदर्भातील या पूरस्थितीत मदतीला विलंब लागल्यानेच घरे आणि शेतीचे मोठे नुकसान झाल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
सध्या कोरोनाच्या काळामध्ये राज्यातील महाविकास आघाडीचा नाकर्तेपणा जनतेला दिसत आहे. तो लपविण्यासाठी केंद्र सरकारकडे बोट दाखविण्याचे काम सुरू आहे, असा आरोप करत फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. कोल्हापूरची कोरोना स्थिती गंभीर असल्याचे सांगत कोरोनावरुन राज्य सरकारच्या कारभारावर देवेंद्र फडणवीस सातत्याने लक्ष ठेऊन उणीवा आणि चुका दाखवून देत आहेत. त्यातच, पूरस्थितीमुळे विदर्भातील 5 जिल्ह्यामध्ये जनजीवन विस्कळीत झाले आहे.
पुराचे पाणी शिरल्याने पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मोठे नुकसान झाले आहे. 36 तास हाती असताना वेळीच उपाययोजना केल्या असत्या, तर मोठे नुकसान टळले असते. पण, मदतीला विलंब लागल्याने घरे आणि शेतीचे मोठे नुकसान झाले आहे, असे म्हणत फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. मध्य प्रदेश सरकारसोबत राज्य शासनाने योग्य समन्वय साधला नाही. राजीव सागर धरणातून पाणी सोडल्यानंतर ते पाणी 36 तासात पूर्व विदर्भात पोहोचते. मात्र, 36 तास हाती असतानाही विलंब केल्याने हे पाणी गावात शिरले. वेळीच अलर्ट दिला असता, तर हे संकट टाळता आलं असतं, असेही फडणवीस यांनी म्हटले. भंडारा जिल्ह्यात या पूरस्थितीचा मोठा फटका बसला असून तब्बल 5 हजार कुटुंब बाधित झाले आहेत. नदीकिनारच्या शेतीचेही मोठे नुकसान झालंय. चंद्रपूर आणि गोंदिया जिल्ह्यातही तीच परिस्थितील असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, कर्नाटकमधील अलमट्टीप्रश्नी आता महाराष्ट्राने खंबीर भूमिका घ्यावी. आम्ही त्यांच्यासमवेत आहोत; कारण उंची वाढवल्यामुळे काय परिणाम होतील हे आपल्याला गेल्यावर्षीच कळून चुकले आहे, असेही त्यांनी यापूर्वीच म्हटले आहे.
भंडारा जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर
भंडारा तालुक्यातील 23 गावातील 1790 कुटुंब, पवनी तालुक्यातील 22 गावातील 505, तुमसर तालुक्यातील 5 गावातील 127, मोहाडी तालुक्यातील 6 गावातील 167 व लाखांदूर तालुक्यातील 2 गावातील 57 कुटुंब असे एकूण 58 गावातील 2646 कुटुंब बाधित झाले आहेत. बाधित कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलविण्यात येत असून जिल्हाधिकारी संदीप कदम यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा प्रशासन युद्धस्तरावर मदत व बचाव कार्य करीत आहे. नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी केले आहे. प्रशासन आपल्या सोबत असल्याची ग्वाही त्यांनी जिल्हावासीयांना दिली आहे.
लढाई मोदींशी नाही, कोरोनाशी आहे
बिगरभाजप मुख्यमंत्र्यांच्या बैठकीवेळी उद्धव ठाकरे यांनी मोदी यांचे नाव न घेता, लढायचं की नाही हे एकदा ठरवा, असे विधान केले होते. याबाबतही फडणवीस म्हणाले होते, उद्धव ठाकरे यांच्या हे कोणीतरी लक्षात आणून दिले पाहिजे की, आपली लढाई कोरोनाशी सुरू आहे. ती नीट लढली पाहिजे. लढाई मोदी यांच्याशी नाही.