लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कुर्ला, सीएसटी रोड येथील किस्मतनगरच्या पाइप गल्लीमध्ये असलेल्या भंगारच्या दुकानांना बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच, घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी १३ फायर इंजिनच्या मदतीने आग शमविण्याचे काम हाती घेतले. मात्र, आगीचे स्वरूप मोठे असल्याने आणि गल्ली असल्याने आगीवर नियंत्रण मिळविणे कठीण जात होते. दुसरीकडे हा परिसर मोठ्या प्रमाणावर भंगार साहित्याचा असल्याने आग मोठी पसरत होती, तर येथून निघत असलेला धूर दुरून दिसत होता. रात्री उशिरापर्यंत येथील आग शमविण्याचे काम सुरू होते.
येथील आगीची माहिती मिळताच, महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन दुर्घटनेची माहिती घेतली. त्यानंतर, अग्निशमन दलाचे अधिकारी व महापालिका अधिकाऱ्यांसमवेत या ठिकाणी लागलेल्या आगीबाबत चर्चा केली. त्या म्हणाल्या की, जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीतील ही जागा असून, यापूर्वी या ठिकाणी लागलेला आगीच्या घटना लक्षात घेता, या ठिकाणी मिनी फायर स्टेशन बांधण्यात यावे, अशी मागणी झाली होती. अरुंद गल्ल्यांमध्ये आग विझविण्यात येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन, या ठिकाणी तत्काळ मिनिफायर स्टेशन करण्याबाबत लवकरच संबंधितांची बैठक घेणार आहे. मुंबईमध्ये यापूर्वी लागलेल्या आगीच्या दुर्घटनेनंतर सर्व ठिकाणचे फायर ऑडिट करण्याचे निर्देश अग्निशमन दलासोबत घेतलेल्या बैठकीत दिले असल्याचे महापौरांनी सांगितले. या आगीचा संपूर्ण अहवाल आल्यानंतरच यामध्ये जो कोणी दोषी आढळेल, त्यांच्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचे महापौरांनी सांगितले.