कोळसा साठ्यात मोठी वाढ; वीज कपातीचे संकट टळले, काही उद्योगांना करावा लागतोय टंचाईचा सामना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 12:48 PM2021-11-09T12:48:48+5:302021-11-09T12:50:01+5:30
आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच विजेची मागणीही वाढली.
मुंबई : ऑक्टोबरमध्ये कोळसा साठा २७.१३ टक्क्यांनी वाढून ५.९७ कोटी टन झाला. त्यामुळे देशापुढील वीज कपातीचे संकट टळले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये वीज क्षेत्रातील कोळसा पुरवठा ४.६८ कोटी टन होता, असे, सूत्रांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय बाजारात कोळशाच्या दरात प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच विजेची मागणीही वाढली. त्यामुळे वीज प्रकल्पांना कोळशाची गरज भागविताना कठीण स्थितीचा सामना करावा लागत होता. अनेक वीज प्रकल्प कोळशाअभावी बंद करावे लागतात की काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. कोळसा साठा वाढल्यानंतर हे मळभ आता निवळले आहे. काही उद्योग मात्र अजूनही कोळसा टंचाईचा सामना करीत आहेत.
शासकीय आकडेवारीनुसार, गेल्या महिन्यात स्पॉन्ज आयर्न क्षेत्रात कोळशाचा पुरवठा २९.२ टक्क्यांनी घटून ६.५ लाख टनांवरून ४.६ लाख टनांवर आला. सिमेंट क्षेत्रातील कोळसा पुरवठा ६.८ लाख टनांवरून ४.७ लाख टनांवर घसरला आहे. इस्पात व सिमेंट याशिवाय अन्य उद्योग क्षेत्रातील कोळसा पुरवठा ४१.९ लाख टनांवर घसरला. गेल्या वर्षी याच कालावधीत तो ६७.१ लाख टन होता.देशातील ७० टक्के वीज कोळशावर चालणाऱ्या प्रकल्पात निर्माण होते.
केंद्रीय कोळसामंत्री प्रल्हाद जोशी यांनी अलीकडेच कोल इंडिया व अन्य कोळसा कंपन्यांना देशातील औष्णिक विद्युत प्रकल्पांकडे किमान १८ दिवस पुरेल एवढ्या कोळशाची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहेत. देशांतर्गत कोळसा उत्पादनात कोल इंडियाची हिस्सेदारी ८० टक्के आहे. देशांतर्गत कोळसा उत्पादन वाढविण्यावर सरकार भर देत असून, कंपन्यांना नवी उद्दिष्टे निश्चित करण्यास सांगण्यात आले आहे.