Join us

जिथे खातो, तिथेच कचऱ्याचे डबे; सीएसएमटी स्थानकावरील खाद्यपदार्थांची किंमत अव्वाच्या सव्वा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2020 2:39 AM

सीएसएमटीला ‘ईट राइट’ म्हणून घोषित करण्यात आले आहे.

मुंबई : सीएसएमटीला ‘ईट राइट’ म्हणून घोषित करण्यात आले आहे. मात्र येथे अन्नपदार्थांची सुरक्षा पाहता, जिथे प्रवासी खाद्यपदार्थ खातात, तिथेच कचऱ्याचे डबे ठेवले आहेत. तंबाखूचे सेवन केलेले कर्मचारी खाद्यपदार्थांची विक्री करतात. यासह स्टॉलवरील खाद्यपदार्थांची किंमत अव्वाच्या सव्वा घेतली जात आहे. त्यामुळे प्रवाशांना जादा रक्कम देऊन खाद्यपदार्थ खरेदी करावे लागत आहेत.अन्न हाताळणीची बोंबाबोंब

सीएसएमटी स्थानकावरील खाद्यपदार्थांच्या स्टॉलजवळच मोठे कचऱ्याचे डबे ठेवण्यात आले आहेत. तेथेच प्रवाशांना खाद्यपदार्थ खाण्याची व्यवस्था केली आहे. कर्मचाऱ्यांच्या हातात हातमोजे नाहीत. तंबाखू सेवन केलेले कर्मचारी खाद्यपदार्थांची विक्री करतात. शिळी झालेली पावभाजी, मिसळपाव यांची विक्री केली जाते. खाद्यपदार्थ बनविण्यासाठी हलक्या दर्जाचे तेल वापरले जाते. खराब असलेल्या पदार्थांपासून खाद्यपदार्र्थ तयार केले जातात.

अव्वाच्या सव्वा किंमत

स्टॉलवरील प्रत्येक पदार्थाची किंमत दुप्पट-तिप्पट आहे. वडापाव, समोसा, सरबत यासारख्या सर्वच पदार्थांची किंमत जास्त आहे. परिणामी याचा थेट फटका प्रवाशांना बसतो. १०-१२ रुपयांचा असलेला वडापाव २५ ते ३० रुपयांना विकला जातो. चहापासून ते इतर सर्व पदार्थांची किंमत अशाच प्रकारची असल्याचे दिसून येते.

ऋतुमानानुसार खाद्यपदार्थ नाही

सीएसएमटीच्या कोणत्याही खाद्यपदार्थांच्या स्टॉलवर ऋतुमानानुसार कोणतेही खाद्यपदार्थ दिले जात नाहीत. नेहमीप्रमाणे वडापाव, समोसा, सॅण्डविच, इडली, डोसा यासारखे पदार्थ वर्षभर प्रवाशांना दिले जातात.

‘नो बिल, नो पेमेंट’ मोहिमेचे तीनतेरा

रेल्वे प्रशासनाने मोठ्या दिमाखात सुरू केलेल्या मोहिमेचे तीनतेरा वाजले आहेत. प्रत्येक स्टॉलवर ‘नो बिल, नो पेमेंट’ असे फलक लागले आहेत. मात्र खाद्यपदार्थांच्या स्टॉलवरील कर्मचाºयांकडून स्वत:हून बिल दिले जात नाही. कर्मचाºयाकडे बिलाची मागणी केल्यावरच बिल दिले जाते.

अनधिकृत फेरीवाल्यांची चलती

सीएसएमटीवर अनधिकृतरीत्या पाण्याच्या बाटल्या, चहा-कॉफी, वडापाव असे पदार्थ सर्रास विकले जातात. या विक्रेत्यांकडे कोणत्याही प्रकारचे बिल नसते. त्याकडील असलेल्या खाद्यपदार्थाचा दर्जा कमी असतो.

काय आहे ‘ईट राइट’ स्थानक?

इंडियन कॅटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कॉर्पोरेशनतर्फे (आयआरसीटीसी) विशेष प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, प्रवाशांना आरोग्यासाठी आणि योग्य अन्न निवडीसाठी मदत करण्यासाठी भारतीय रेल्वेने फूड सेफ्टी अ‍ॅण्ड स्टँडर्ड्स अ‍ॅथॉरिटी ऑफ इंडियाने (एफएसएसएआय) २०१८ मध्ये सुरू केलेल्या ‘ईट राइट इंडिया’ चळवळीचा एक भाग म्हणून ‘ईट राइट स्टेशन’ ही चळवळ सुरू केली. या चळवळीअंतर्गत मध्य रेल्वेचे पहिले सीएसएमटी रेल्वे स्थानक ‘ईट राइट’ स्थानक ठरले आहे.अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेचे पालन, निरोगी आहाराची उपलब्धता, तयारीच्या वेळी अन्न हाताळणी, हस्तांतरण, अन्न कचरा व्यवस्थापन, स्थानिक व हंगामी खाद्य पदोन्नती आणि खाद्य सुरक्षेबाबत जनजागृती केली जाते.

टॅग्स :छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसभारतीय रेल्वेलोकलमहाराष्ट्रमुंबई