Join us

कोस्टल रोडनजीक सर्वांत मोठा पदपथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2019 2:32 AM

२० मीटर रुंद व ६ किमी लांब : पहिल्या टप्प्याचे काम सुरू

मुंबई : महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या कोस्टल रोडजवळ लवकरच मुंबईतील सर्वांत मोठा ‘समुद्री पदपथ’ तयार होत आहे. तब्बल २० मीटर रुंद व ६.४ कि.मी. लांबीचा हा पदपथ समुद्राला जोडून व कोस्टल रोडलगत बांधला जाणार आहे. प्रियदर्शनी पार्क ते वरळी वांद्रे सी-लिंकदरम्यान हा पदपथ असणार आहे.

नेताजी सुभाष मार्गालगत (मरिन ड्राइव्ह) असणारा ‘समुद्री पदपथ’ हा मुंबईतील सर्वांत मोठा ‘समुद्री पदपथ’ म्हणून ओळखला जात होता. त्याची लांबी सुमारे ३.५ किमी एवढी आहे. मात्र, कोस्टल रोडलगत आकारास येणारा नवीन ‘समुद्री पदपथ’ ६.४ किमी लांबीचा असल्याने तो मुंबईतील सर्वांत मोठा ‘समुद्री पदपथ’ ठरणार आहे, अशी माहिती सागरी किनारा रस्त्याचे प्रमुख अभियंता मोहन माचीवाल यांनी दिली. प्रिन्सेस स्ट्रीट फ्लायओव्हर ते वरळी वांद्रे सी-लिंक बाजूपर्यंत ९.९८ किमी लांबीच्या कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्याचे काम गेल्या महिन्यात सुरू झाले. यापैकी ३.४५ कि.मी. लांबीचा भाग बोगद्यातून जाणारा आहे. हा श्यामलदास गांधी उड्डाणपूल ते प्रियदर्शनी पार्कदरम्यान असणार आहे. तर प्रियदर्शनी पार्क ते वरळी वांद्रे सी-लिंकपर्यंतच्या कोस्टल रोडलगत नवीन विस्तीर्ण समुद्री पदपथ बांधण्यात येणार आहे.प्रियदर्शनी पार्क ते वरळी वांद्रे सी-लिंकपर्यंतच्या सागरी किनारा रस्त्यालगत ६.४ कि.मी. लांबीचा सलग पदपथ बांधण्यात येणार आहे. या विस्तीर्ण पदपथाची रुंदी ही २० मीटर म्हणजेच सुमारे ६५ फूट एवढी असणार आहे.प्रस्तावित सागरी किनारा रस्त्यांतर्गत लोट्स ते समुद्री महलदरम्यान सुमारे ४०० मीटर लांबीचा व ४५ मीटर रुंदीचा पूलही बांधण्यात येणार आहे. या पुलावरील रस्त्यालगत दोन्ही बाजूंना ३.५ मीटर रुंदीचे म्हणजेच एकूण सात मीटर रुंदीचे पदपथ असणार आहेत.त्यानुसार वरळी वांद्रे सी-लिंकच्या वरळी बाजूपासून प्रियदर्शनी पार्कपर्यंत असणाऱ्या समुद्री पदपथाची एकूण लांबी ही ६.४ कि.मी. एवढी असणार आहे.नेताजी सुभाष मार्गालगत असणारा समुद्री पदपथ हा सुमारे ३.५ कि.मी. लांबीचा आहे. त्यामुळे कोस्टल रोडलगत आकारास येणारा हा समुद्री पदपथ मुंबईतील सर्वांत मोठा पदपथ ठरणार आहे.

टॅग्स :मुंबई