मुंबई : संतलाल पाल या ३१ वर्षीय रुग्णाच्या डोक्यातून तब्बल १.८७३ किलोग्रॅमचा ट्युमर काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. चार वर्षांनंतर या रुग्णाची ट्युमरमधून सुटका झाली आहे.हा रुग्ण मुंबई सेंट्रल येथील बाई य. ल. नायर चॅरिटेबल रुग्णालय आणि टोपीवाला नॅशनल मेडिकल महाविद्यालयाच्या न्युरोसर्जरी (मज्जातंतू शल्यचिकित्सा) विभागात डोकेदुखीवरील उपचारासाठी दाखल झाला होता. रुग्ण पेशाने कापड विक्रेता आहे. सातत्याने केवळ डोकेदुखीचा त्रास होत होता. त्याच्या सीटी आणि मेंदूच्या एमआर स्कॅनची तपासणी करण्यात आली तसेच ट्युमरचा रक्तपुरवठा अभ्यास करण्यासाठी विशिष्ट सीटी अॅन्जिओग्राफी करण्यात आली. कवटीच्या हाडांद्वारे मिडलाइनच्या दोन्ही बाजूंवर ३०७३०७२० सेंटीमीटरची गाठ पसरली होती. या गाठीमुळे डोक्यावर जडपणा व दृष्टीदोषात वाढ होऊन अंधत्व आले होते. अखेर नायरमधील न्युरोसर्जरीचे प्रमुख डॉ. त्रिमूर्ती नाडकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रेन ट्युमरची शस्त्रक्रिया करण्यात आली. सात तास चाललेल्या शस्त्रक्रियेद्वारे गाठ काढण्यात आल्याचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले.मेंदूला गाठ असलेल्या अनेक रुग्णांवर येथील विभागात उपचार केले जातात. मात्र या रुग्णाचे प्रकरण वेगळे होते. या रुग्णाचा ट्युमर डोक्याएवढाच मोठ्या आकाराचा होता. डोक्यातील रक्तवाहिन्या या गाठीत पसरल्या होत्या. शस्त्रक्रियेनंतर संतलाल तीन दिवस व्हेंटिलेटरवर होता. आता त्याची प्रकृती सुधारत आहे.- डॉ. त्रिमूर्ती नाडकर्णी,मेंदूविकार शस्त्रक्रिया विभागप्रमुख
डोक्यातून काढला सर्वांत मोठा ट्युमर, वजन १.८ किलोग्रॅम; नायर रुग्णालयात शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 6:17 AM