आहारात अळ्या, उंदरांच्या लेंड्या; चेंबूरच्या शासकीय वसतिगृहात विद्यार्थिनींचा ‘अन्नत्याग’
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2023 06:34 AM2023-12-18T06:34:44+5:302023-12-18T06:34:53+5:30
चहा-नाश्त्यासाठी जुनी बिस्किटे, खराब व कुजलेली फळेसुद्धा दिली जात आहेत. काही खाद्यपदार्थांमध्ये तर उंदराच्या लेंड्याही आढळल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शिक्षणासाठी आपले घर, गाव सोडून चेंबूर येथील माता रमाई आंबेडकर मुलींच्या शासकीय वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थिनींना निकृष्ट दर्जाचा आहार पुरवला जात असल्याचे उघड झाले आहे. विद्यार्थ्यांना जेवणात अळ्या सापडल्या आहेत.
चहा-नाश्त्यासाठी जुनी बिस्किटे, खराब व कुजलेली फळेसुद्धा दिली जात आहेत. काही खाद्यपदार्थांमध्ये तर उंदराच्या लेंड्याही आढळल्या आहेत. याबाबत वारंवार तक्रारी करूनही प्रशासन लक्ष देत नसल्याने संतापलेल्या विद्यार्थिनींनी रविवारी वसतिगृहातच अन्नत्याग आंदोलन केले. चेंबूर येथे माता रमाई आंबेडकर मुलींचे शासकीय वसतिगृह व डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृह आहे. येथील विद्यार्थ्यांना राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाकडून नियुक्त केलेल्या क्रिस्टल कंत्राटदाराकडून आहाराचा पुरवठा केला जातो. मात्र कंत्राटदार अतिशय निकृष्ट दर्जाचे जेवण विद्यार्थ्यांना पुरवत आहे. अशा निकृष्ट आहारामुळे काही विद्यार्थी आजारी पडले होते, असा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.
विद्यार्थी जेव्हा मेस कंत्राटदाराला विचारणा करतात तेव्हा कंत्राटदार विद्यार्थ्यांवर गुंडगिरीची भाषा वापरतात. ही बाब विद्यार्थ्यांनी सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
...अन्यथा आंदोलन
वसतिगृहात अन्नत्याग आंदोलन झाल्याचे समजताच सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनास भेट दिली. तसेच नवीन ठेकेदार उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. दोन दिवसांत ठेकेदार बदलला नाही तर सहायक आयुक्तांच्या दालनात आंदोलन करु, असा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.