Join us

लासलगावात पेटवण्यात आलेल्या महिलेची प्रकृती गंभीर; उपचारांसाठी मुंबईत हलवलं

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 10:34 AM

पीडित महिला 67 टक्के भाजली असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले आहे. 

ठळक मुद्देलासलगावमध्ये एका विवाहितेला पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील मसीना रुग्णालयात पीडितेवर उपचार सुरू आहेत. पीडित महिला 67 टक्के भाजली असून तिची प्रकृती गंभीर.

नाशिक - हिंगणघाट जळीत प्रकरणामुळे संतापाची लाट असतानाच लासलगावमध्ये एका विवाहितेला पेट्रोल टाकून जाळून मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. लासलगाव बसस्थानकावर निफाड तालुक्यातील पिंपळगाव येथे ही धक्कादायक घटना घडली. यामध्ये पीडित महिला 67 टक्के भाजली असून तिची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. महिलेला उपचारासाठी मुंबईत हलवण्यात आले आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, लासलगाव बसस्थानकावर पिंपळगाव येथे एका विवाहित महिलेला चार जणांनी पेट्रोल टाकून तिला पेटवून देत जाळून मारण्याचा प्रयत्न केला. यामध्ये पीडित महिला गंभीर भाजली असून तिला तातडीने लासलगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र महिलेची प्रकृती गंभीर असल्याने तिला उपचारार्थ नाशिकला जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. त्यानंतर आता पुढील उपचारांसाठी मुंबईत हलवण्यात आले आहे. मुंबईतील मसीना रुग्णालयात पीडितेवर उपचार सुरू आहेत. 

लासलगावमध्ये एका महिलेवर पेट्रोल टाकून पेटवून ठार मारण्याचा झालेला प्रयत्न अत्यंत निंदणीय आहे. या दुर्दैवी घटनेची सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. चौकशीअंती जे कोणी दोषी आढळून येतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी पीडितेला धीर देत ‘तुम्ही लवकर बरे व्हा, कुठल्याहीप्रकारची चिंता मनात बाळगू नका, डॉक्टरांकडून सर्वोतोपरी उपचार केले जात आहे, तुम्ही लवकर बरे व्हाल’असं देखील म्हटलं आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना निफाड तालुक्यातील लासलगावमध्ये एका बसस्थानकावर महिलेवर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न झाल्याची घटना शनिवारी (15 फेब्रुवारी) संध्याकाळच्या सुमारास घडली. या घटनेत पीडित महिला 67 टक्के भाजली असल्याचे वैद्यकिय सूत्रांनी सांगितले. घटनेची माहिती समजताच ठाकरे रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास जिल्हा शासकिय रुग्णालयात पोहचले. गंभीररित्या भाजलेल्या महिलेची जळीत कक्षात जाऊन त्यांनी पाहणी केली. यावेळी तिच्या नातेवाईकांनी दिलेले निवेदन स्विकारले. 

 

महत्त्वाच्या बातम्या 

Delhi Election Results : हटके असणार केजरीवालांचा शपथविधी; ते 50 'आम आदमी' ठरणार लक्षवेधी

Delhi Election Results : अरविंद केजरीवाल तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होणार, आज शपथ घेणार

China Coronavirus : जगभरात ६७ हजार लोकांना कोरोनाचा संसर्ग; तब्बल १६०० बळी

'मतभेदांना देशविरोधी ठरवणं हा लोकशाहीवरील हल्ला'

राज्यात लवकरच शेतीसाठी पाणी महागणार, उद्योजकांनाही फटका

 

टॅग्स :नाशिकमुंबईहॉस्पिटलउद्धव ठाकरे