मृतदेहावरून गेल्या १५ लोकल
By admin | Published: January 9, 2017 05:07 AM2017-01-09T05:07:07+5:302017-01-09T05:07:07+5:30
मुंबई उपनगरीय मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे अपघात होतात आणि या अपघातात जखमींना तत्काळ मदत मिळावी, अशी अपेक्षा असते.
मुंबई : मुंबई उपनगरीय मार्गावर मोठ्या प्रमाणात प्रवाशांचे अपघात होतात आणि या अपघातात जखमींना तत्काळ मदत मिळावी, अशी अपेक्षा असते. मात्र, अपघातात जखमींना तर सोडाच, पण जागीच मृत्यू आलेल्या व्यक्तींचीही हेळसांड होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मध्य रेल्वेवरील ठाकुर्ली रेल्वे स्थानकात लोकल धडकेत एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्यानंतर, त्याचा मृतदेह उचलण्यासाठी एक तास वाट पाहावी लागली आणि यात त्याच्या अंगावरूनच १५ लोकल गेल्या. ही बाब किरण मेस्त्री या जागरूक महिला प्रवाशाने आरपीएफ (रेल्वे सुरक्षा दल) आणि रेल्वे प्रशासनाच्या लक्षात आणून दिल्यानंतर, एक तासानंतर मृतदेह रुळाच्या बाजूला करण्यात आला.
४७ वर्षांच्या असणाऱ्या किरण मेस्त्री या ठाकुर्ली येथे राहातात. ६ जानेवारी रोजी मेस्त्री या रात्री साडेआठच्या सुमारास ठाकुर्ली स्थानकात उतरल्या. प्लॅटफॉर्मवर उतरताच, सीएसटीच्या दिशेने त्यांना प्रवाशांची व विक्रेत्यांची गर्दी दिसली. यातील त्यांच्या एका ओळखीच्या गजरा विक्रेत्या असणाऱ्या महिलेला त्यांनी विचारले असता, सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या जलद मार्गावर अपघातग्रस्त एक २५ ते २७ वर्षीय तरुण पडल्याचे निदर्शनास आणून दिले. लोकलच्या धडकेत तरुणाचा अपघात होतानाच, त्याच्या मृतदेहाचे काही तुकडे हे प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरील रुळावरही पडले होते. यात बघ्यांची मोठी गर्दी होती. अपघात होऊन अर्धा तास झाला, तरी मृतदेह उचलण्यासाठी रेल्वे पोलीस किंवा हमाल यापैकी कुणीही आले नसल्याची माहिती मेस्त्री यांना प्लॅटफॉर्मवरील विक्रेत्यांकडून देण्यात आली. ही माहिती मिळताच, तत्काळ मेस्त्री यांनी प्लॅटफॉर्मवरच असणाऱ्या आरपीएफला हमाल आणून मृतदेह उचलण्याची विनवणी केली. त्या वेळी त्यांना हमाल येत असल्याचे आरपीएफकडून सांगण्यात आले. मात्र, काही वेळ उलटून गेल्यानंतरही हमाल आले नाही, तोपर्यंत मृतदेहावरून बऱ्याच लोकल जात होत्या. मृतदेहाची हेळसांड होत असल्याने, त्यांनी तत्काळ मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक यांना ‘टिष्ट्वटर’द्वारे माहिती दिली व मदतीची याचना केली. त्या वेळी संबंधित विभागाला माहिती देत असल्याचे टिष्ट्वटरद्वारे मेस्त्री यांना सांगितले. पाच ते दहा मिनिटे वाट पाहिल्यानंतर मेस्त्री यांना पुन्हा एकदा विभागीय व्यवस्थापकांकडून आणखी काही माहिती द्या, अशी टिष्ट्वटरद्वारे विचारणा केली. अखेर किरण मेस्त्री यांनी आरपीएफच्या हेल्पलाइनवर मदत मागितली. पंधरा मिनिटानंतर स्थानकांवर उद्घोषणा होत हमालांना बोलावण्यात आले. यात अपघात होऊन जवळपास एक तास झाल्यानंतर घटनास्थळी आरपीएफ हमालांसह पोहोचले. या वेळी काही प्रवासीही रुळावर उतरले आणि त्यांनी सीएसटीच्या दिशेने जाणारी एक लोकल थांबवली. यातील एका मालडब्यात मृतदेह ठेवण्यात आला आणि आरपीएफ व हमालांसह ही ट्रेन पुढे रवाना झाली. (प्रतिनिधी)