मालमत्ता कर भरण्यासाठी शेवटचे ३ दिवस, अन्यथा दंड भरा; पालिकेचा करदात्यांना इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Published: May 23, 2024 09:54 AM2024-05-23T09:54:52+5:302024-05-23T09:58:34+5:30

नागरी सुविधा केंद्रे राहणार सुरू : चार हजार ३२० कोटी रुपये जमा.

last 3 days to pay property tax otherwise pay penalty bmc warning tax payers  | मालमत्ता कर भरण्यासाठी शेवटचे ३ दिवस, अन्यथा दंड भरा; पालिकेचा करदात्यांना इशारा 

मालमत्ता कर भरण्यासाठी शेवटचे ३ दिवस, अन्यथा दंड भरा; पालिकेचा करदात्यांना इशारा 

मुंबई : यंदाच्या आर्थिक वर्षाचा मालमत्ता कर भरण्यासाठी शेवटचे तीन दिवस शिल्लक आहेत. त्यानंतर मुंबईकरांना मालमत्ता करावर प्रतिमहिना दोन टक्के आर्थिक दंड आकारण्यात येणार आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी महापालिका प्रशासनाने २३ आणि २४ मे रोजी सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत तसेच २५ मे रोजी सकाळी ८ ते मध्यरात्री १२ वाजेपर्यंत नागरी सुविधा केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
 
महापालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन विभागाकडे बुधवारपर्यंत चार हजार ३२० कोटींचा मालमत्ता कर जमा झाला होता. यंदाच्या वर्षासाठी पालिकेकडून साडेचार हजार कोटींचे मालमत्ता कराचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे. मालमत्ता कर थकविणाऱ्यांवर पालिकेकडून कडक कारवाईचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्या मालमत्ताधारकांनी वर्षानुवर्षे कर भरलेला नाही, त्यांना मालमत्तांच्या जप्तीची नोटीस दिली आहे. जप्तीनंतरही कबाकीदारांकडून कर वसूल न झाल्यास वस्तूंच्या लिलावाद्वारे विक्री करण्याची कार्यवाही सुरू करावी, अशा सूचना पालिका आयुक्तांनी दिल्या आहेत. त्यामुळे २५ मेनंतर पालिकेकडून या कारवाईला सुरुवात होईल, असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

दिवसभरात ९२.४८ कोटी जमा-

१)  बहुतांशी मालमत्ताधारक अखेरच्या क्षणी कर भरणा करतात. 

२)  पालिकेने बुधवारी दिवसभरात ९२.४८ कोटींची करवसुली केली. 

३) ३१ मार्चची मुदत उलटल्यानंतर १,१२४ कोटींचा मालमत्ता कर जमा झाला असल्याचे करनिर्धारण व संकलक विभागाचे सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांनी सांगितले.

सरकारी प्राधिकरणांना पाठवली स्मरणपत्रे-

१) अनेक सरकारी यंत्रणा आणि प्राधिकरणांनीदेखील पालिकेचा कोटींचा मालमत्ता कर थकविला आहे. मात्र, वर्षानुवर्षे या प्राधिकरणांकडून कर भरण्यास टाळाटाळ केली जात आहे. 

२) यंदाही पालिकेच्या करनिर्धारण आणि संकलन विभागाकडून या प्राधिकरणांना स्मरणपत्रे पाठविण्यात आली असून मालमत्ता कर भरण्यासाठी सांगण्यात आले आहे.

... कारवाई टाळा

मालमत्ताधारकांना कर भरणे सोयीचे व्हावे, यासाठी रोखीने देयक जमा करण्यासोबतच धनादेश, डिमांड ड्राफ्ट, ऑनलाइन पद्धतही सुविधा उपलब्ध केली आहे. त्यामुळे २५ मेपर्यंत कर भरा आणि कारवाई टाळा, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

Web Title: last 3 days to pay property tax otherwise pay penalty bmc warning tax payers 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.