वाड्याची पोलीस वसाहत घेतेय अखेरचा श्वास
By admin | Published: April 7, 2015 10:50 PM2015-04-07T22:50:21+5:302015-04-07T22:50:21+5:30
डी प्लस झोनमुळे वाडा तालुका झपाट्याने विस्तारतो आहे. वाढत्या शहरीकरणामुळे कायदा तसेच सुव्यवस्थेचा पोलिसांवरील ताणही वाढतो आहे.
कुडूस : डी प्लस झोनमुळे वाडा तालुका झपाट्याने विस्तारतो आहे. वाढत्या शहरीकरणामुळे कायदा तसेच सुव्यवस्थेचा पोलिसांवरील ताणही वाढतो आहे. मात्र हीच कायदा व सुव्यवस्था राखणारे पोलीस निवासस्थानाअभावी वाऱ्यावर आहेत. हक्काच्या घराअभावी कार्यालयाशी संपर्क राखण्यात पोलीसांना अनेक अडचणीना तोंड द्यावे लागतेय. असलेली पोलीस वसाहत ही स्वातंत्र्यापूर्वीची असल्याने ऊन पाऊस वारा खाऊन ही जीर्ण झाली आहे.
वाडा पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात कुडूस, खानिवली, गोऱ्हे आणि परळी हे प्रमुख चार भाग येतात. आदिवासी बहुल वस्ती असल्याने सणासुदीच्या दिवसात, निवडणुकांच्या काळात आणि प्रामुख्याने पावसात अनेक प्रश्न निर्माण होतात. अशा वेळी पोलीस कुमक वेळेवर पोहचणे आवश्यक असते. मात्र वाडा पोलीस ठाण्यानजीक २५ गुंठे जागा असूनही पोलीस अधिकारी व पोलिसांसाठी नवीन घरे (इमारत) बांधली नसल्याने आणि जुनी चाळ मोडकळीस आल्याने त्यांच्यावर भाड्याच्या घरात राहण्याची पाळी ओढावली आहे. डी प्लस झोनमुळे वाड्यात मोठ्या रकमेचे भाडे व डिपॉझीट पोलीसांना भरावी लागते. पगाराच्या मानाने भाड्यावर जास्त खर्च होत असल्याने कर्मचाऱ्यात नाराजी आहे. मात्र हक्काची जागा असूनही अधिकाऱ्यांच्या अनास्थेपायी पोलीस वसाहतीच्या बांधकामाचा प्रश्न गेली १० वर्षे लोंबकळत आहे.
पोलीस यंत्रणा हाकेच्या अंतरावर असली पाहिजे याचा गांभीर्याने विचार करून शासनाने पोलीस वसाहत नव्याने बांधण्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून द्यावा असे नारो संघटनेचे अध्यक्ष प्रा. धनंजय पष्टे यांनी सांगितले तर अल्पसंख्याक समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मुस्तफा मेमन यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस कर्मचारी करतात. पुरेसे वेतन पोलीसांना दिले जात नाही. पुरेशा सुविधाही त्यांना नसतात याचा विचार करून पोलीसांना वाड्यात उपलब्ध जागेत सुसज्ज इमारत बांधून द्यावी अशी मागणी आहे. हे न झाल्यास त्याचा परीणाम पोलिसांच्या मनोधैर्यावर होईल. (वार्ताहर)