आतापर्यंत प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना २६ मार्चपर्यंत घेता येणार प्रवेश
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना संकट काळात काही विद्यार्थी अकरावीच्या प्रवेशापासून वंचित राहिल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांना प्रवेशासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी काही दिवसांपूर्वी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाने राज्य सरकारकडे केली होती. त्यानुसार, अकरावीच्या शैक्षणिक वर्ष २०२०-२१ साठी प्रवेश प्रक्रियेला अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य (एफसीएफएस) या तत्त्वावर प्रवेश घेण्यास २६ मार्चपर्यंत मुदत देण्यात आल्याचे शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी पत्राद्वारे स्पष्ट केले.
२६ मार्चनंतर कोणत्याही परिस्थितीत प्रवेशासाठी कोणतीही मुदतवाढ देण्यात येणार नाही, तसेच जे विद्यार्थी प्रवेशापासून वंचित आहेत, केवळ अशाच विद्यार्थ्यांसाठी ही प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल. अन्य विद्यार्थ्यांना पसंतीक्रम बदलणे किंवा अन्य कारणांसाठी पुन्हा प्रवेश प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी देण्यात येईल, असेही पवार यांनी सांगितले. या दरम्यान झालेले प्रवेश रद्द केल्यास, पुन्हा या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले.
* एफसीएफएस ३ चे वेळापत्रक
१९ मार्च, २०२१ - (सकाळी १० पासून) प्रथम येणाऱ्यास प्रथम प्रधान्यानुसार विद्यार्थ्यांना मिळणार अलॉटमेंट.
१९ मार्च, २०२१ ते २६ मार्च - (सकाळी ११ पासून ते संध्याकाळी ६ पर्यंत) प्रवेश मिळालेल्या कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश प्रक्रियेस सुरुवात.
२६ मार्च, २०२१ - (सायंकाळी ११.३० पर्यंत) संकेतस्थळावर महाविद्यालयांनी प्रवेशाचे स्टेटस अपडेट करणे
* आतापर्यंत असे निश्चित झाले प्रवेश
यंदा मुंबई विभागात एकूण ३ लाख २० हजार ७५० जागा अकरावी ऑनलाइन प्रवेशासाठी उपलब्ध होत्या. त्यापैकी २ लाख ६० हजार ९ जगांसाठी प्रवेश अर्ज विद्यार्थ्यांकडून सादर करण्यात आले होते. ३ नियमित फेऱ्या व २ विशेष फेऱ्या, २ एफसीएफएस फेऱ्यांनंतर मुंबई विभागात आतापर्यंत कला शाखेत एकूण २२ हजार ११४ प्रवेश, वाणिज्य शाखेत १ लाख ३० हजार २९८, विज्ञान शाखेत ६८ हजार १६७, तर एचएसव्हीसी शाखेत ३ हजार ७२ प्रवेश निश्चित झाले.
.......................