लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : सोशल मीडियावर चिथावणीखोर पोस्ट टाकल्याबद्दल बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत व तिची बहीण रंगोली यांच्याविरोधात अहवाल सादर करण्यासाठी अंबोली पोलिसांना अंधेरी दंडाधिकारी न्यायालयाने अखेरची संधी दिली आहे. सोशल मीडियाद्वारे कंगना व तिची बहीण देशात धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, असे म्हणत व्यवसायाने वकील असलेले अली खाशिफ खान देशमुख यांनी अंधेरी न्यायालयात कंगना व तिच्या बहिणीविरोधात खासगी तक्रार केली.
२९ ऑक्टोबर रोजी दंडाधिकारी यांनी अंबोली पोलिसांना यासंदर्भात ५ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. मात्र, पोलिसांनी त्या दिवशी अहवाल सादर करण्यासाठी न्यायालयाकडून मुदतवाढ घेतली. न्यायालयाने ५ जानेवारी रोजी अहवाल सादर करण्याचे निर्देश पोलिसांना दिले होते.
मंगळवारच्या सुनावणीतही पोलिसांनी अहवाल सादर करण्यासाठी आणखी मुदतवाढ मागितली. त्यावर देशमुख यांनी आक्षेप घेतला. “आरोपीला संपर्क साधण्यासाठी आवश्यक ती सर्व माहिती दिली आहे. महिन्याभरापूर्वी माझा जबाब नोंदविण्यात आला. तरीही ते आणखी मुदत मागून न्यायालयाचा वेळ वाया घालवत आहेत. पोलिसांना आणखी वेळ देऊ नये,” अशी विनंती देशमुख यांनी न्यायालयाला केली.
देशमुख यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर दंडाधिकारी भगवंत टी. झिरपे यांनी अंबोली पोलिसांना अहवाल सादर करण्यासाठी ५ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली.