Join us

विधिच्या केटी परीक्षेच्या अर्जाचा शेवटचा दिवस, विद्यार्थी निकालाविना; वर्ष वाया जाणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 6:40 AM

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे सुरू झालेला निकालगोंधळ आॅक्टोबर महिन्यातही संपलेला नाही.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या आॅनलाइन उत्तरपत्रिका तपासणीमुळे सुरू झालेला निकालगोंधळ आॅक्टोबर महिन्यातही संपलेला नाही. विधि अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना केटी परीक्षेचा अर्ज भरण्याची अंतिम तारीख २४ आॅक्टोबर असून, अजूनही विद्यार्थ्यांच्या हातात निकाल आलेले नाहीत. त्यामुळे आता केटी परीक्षेचा अर्ज तरी कसा भरायचा, असा प्रश्न विद्यार्थ्यांना पडला आहे. अनेक विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याची भीती असल्यामुळे मुंबई विद्यापीठाने अर्ज भरण्याची तारीख आणि परीक्षांच्या तारखा बदलाव्यात अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.आॅक्टोबर महिना अर्धा संपत आला तरी अजूनही विद्यार्थ्यांना निकाल मिळालेले नाहीत. अनेक विद्यार्थ्यांचे निकाल रखडल्यामुळे आता पुढे काय, हा प्रश्न विद्यार्थ्यांसमोर आ वासून उभा आहे. अनेक विद्यार्थ्यांचे निकाल पाच ते सहा दिवसांत जाहीर होतील असे आश्वासन विद्यापीठाने देऊन पंधरा दिवस उलटले आहेत. तरीही विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिका, निकाल हाती येत नाहीत. तीन ते चार तास रांगेत उभे राहूनही विद्यार्थ्यांना कोणतीही माहिती मिळत नसल्याने विद्यार्थी अधिक त्रस्त झाले आहेत.विधि अभ्यासक्रमाच्या केटी परीक्षांचे अर्ज भरण्यासाठी विद्यापीठाने आॅनलाइन पद्धतीने अर्ज भरता येणार असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांनी आॅनलाइन अर्ज भरण्यास पसंती दिली. पण, तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना अर्ज भरता येत नसल्याची तक्रार विद्यार्थी करत आहेत. मुंबईबाहेर अथवा राज्याबाहेर राहणाºया विद्यार्थ्यांचे नुकसान झाले आहे. २४ आॅक्टोबरला केटी परीक्षेचा अर्ज न भरल्यास विलंब शुल्क भरावे लागणार आहे. तसेच, निकाल जाहीर झाला नसल्यामुळे केटी परीक्षेचे अर्ज भरता येणार की नाही? याचाही ताण विद्यार्थ्यांवर आहे. विलंब शुल्क भरायला लागल्यास विद्यार्थ्यांवरचा आर्थिक भार वाढणार आहे.मुंबई विद्यापीठ विद्यार्थ्यांच्या करिअरशी खेळते आहे. विद्यापीठाने निकाल उशिरा लावले आहेत. त्यातच आता अर्ज भरण्याची तारीखही वाढवत नाही. परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विद्यापीठाने अर्ज भरण्याची तारीख वाढवावी तसेच परीक्षाही पुढे ढकलाव्यात. विद्यापीठाने सर्व निकाल लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी स्टुडंट लॉ कौन्सिलचे अध्यक्ष सचिन पवार यांनी केली आहे.केटी परीक्षांचेशुल्क दुप्पटनिकालात गोंधळ झाल्याने विद्यापीठाने विद्यार्थी संघटनांच्या मागणीवरून पुनर्मूल्यांकनाचे शुल्क ५०० रुपयांवरून २५० रुपये केले. पण, गेल्या वर्षी ५०० रुपये परीक्षा शुल्क होते, ते यंदा १ हजार रुपये इतके केले आहे.आता विद्यार्थ्यांना केटी परीक्षा, पुनर्मूल्यांकन आणि नियमित परीक्षांचे अर्ज भरण्यासाठी तब्बल २ हजार २५० रुपये मोजावे लागणार आहेत.

टॅग्स :विद्यापीठ