Join us

पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना शेवटची मुदतवाढ; ३१ ऑगस्टपर्यंत भरता येणार अर्ज

By सीमा महांगडे | Published: August 28, 2023 6:04 PM

मुंबई विद्यापीठामार्फत पहिल्यांदाच ‘ई-समर्थ’ प्रणालीच्या माध्यमातून पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.

मुंबई: मुंबई विद्यापीठाचे शैक्षणिक विभाग, मान्यताप्राप्त संस्था आणि संलग्नित महाविद्यालयातील (स्वायत्त वगळून) पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गत प्रवेश घेण्यासाठी १३ ऑगस्टपर्यंत मुदत होती. आता विद्यापीठातर्फे मुदतवाढ देण्यात आली असून विद्यार्थ्यांना गुरुवार, ३१ ऑगस्टपर्यंत विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रवेश अर्ज भरता येणार आहे.

विद्यार्थ्यांना पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेण्याची ही शेवटची संधी असून यापुढे मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. प्रसाद कारंडे यांनी स्पष्ट केले. प्रवेश नोंदणी ते अर्ज सादर करण्याची प्रक्रिया समजून घेण्यासाठी संकेतस्थळावर चित्रफितीची लिंक देण्यात आली आहे. मुंबई विद्यापीठामार्फत पहिल्यांदाच ‘ई-समर्थ’ प्रणालीच्या माध्यमातून पदव्युत्तर अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. शैक्षणिक वर्ष २०२३-२४ अंतर्गत ‘ई-समर्थ’ प्रणालीच्या माध्यमातून पदव्युत्तर स्तरावरील ‘विज्ञान आणि तंत्रज्ञान’ , ‘मानव्यविज्ञान’, ‘आंतरविद्याशाखीय’ आणि ‘वाणिज्य’ विद्याशाखेच्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू आहे.

टॅग्स :शिक्षणमुंबई विद्यापीठ