‘जे.जे.’तून पाच वर्षांत ३ हजार ८५६ रुग्ण पळाले, एकाही रुग्णाचा तपास नाही लागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 01:36 AM2017-12-12T01:36:15+5:302017-12-12T01:36:39+5:30
मुंबईसह देशभरात आरोग्यसेवेसाठी नावाजलेल्या सर जे.जे. समूह रुग्णालयातून पाच वर्षांत जवळपास ३ हजार ८५६ रुग्ण पळून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पळून गेलेल्या सर्व रुग्णांची लेखी तक्रार जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली असल्याचे माहिती अधिकारातून उघडकीस आले आहे.
मुंबई : मुंबईसह देशभरात आरोग्यसेवेसाठी नावाजलेल्या सर जे.जे. समूह रुग्णालयातून पाच वर्षांत जवळपास ३ हजार ८५६ रुग्ण पळून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पळून गेलेल्या सर्व रुग्णांची लेखी तक्रार जे.जे. मार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली असल्याचे माहिती अधिकारातून उघडकीस आले आहे.
नुकत्याच हाती आलेल्या माहिती अधिकारात २०१३ ते २०१७ मे महिन्याच्या कालावधीत जे. जे. रुग्णालयातून २ हजार ८४१ पुरुष तर १ हजार १५ महिला रुग्ण पळून गेले आहेत.
या रुग्णांनी रुग्णालयातून पळून जाताना ‘डिस्चार्ज’ची कोणतीही औपचारिकता पूर्ण केलेली नसल्याचे दिसून आले आहे. उपचार सुरू असतानाच हे रुग्ण रुग्णालयातून पळून गेल्याचे स्पष्ट झाले आहे, त्यामुळे हे रुग्ण पळून गेल्याची अधिकृत तक्रार रुग्णालय प्रशासनाने त्या-त्या वेळी पोलिसांत केली आहे. परंतु एकाही रुग्णाचा तपास लागेलला नाही.
पैसे नसल्यामुळेच रुग्ण पळतात
जे.जे. रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टरांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, अजूनही काही रुग्णांकडे शिधापत्रिका नसते, ज्यांना ५०० ते १००० रुपये इतकाही खर्च परवडत नाही किंवा ज्यांच्याकडे मोफत वैद्यकीय सेवांचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र नसते, ते रुग्ण पळून जाण्याचा मार्ग स्वीकारतात.