मुंबई : एअर इंडियामध्ये सह वैमानिक असलेल्या अश्रिता चिंचणकर यांनी एअर इंडियामध्येच एअर होस्टेस असलेल्या पूजा चिंचणकर या त्यांच्या आईला निवृत्तीच्या दिवशी शेवटच्या विमान फेरीचे सारथ्य सह वैमानिक म्हणून करून निवृत्तीची गोड भेट दिली. पूजा चिंचणकर यांना त्यांच्या निवृत्तीच्या दिवशी शेवटच्या विमानफेरीचे सारथ्य आपल्या मुलीने करावे अशी इच्छा होती. अश्रिताने त्यांची ही इच्छा पूर्ण केली व आईची इच्छा पूर्ण करण्यात यशस्वी झाल्याने समाधानी व आनंदित असल्याची प्रतिक्रिया दिली. अश्रिताने टष्ट्वीट करून ही माहिती दिली व शेवटच्या विमान फेरीमधील केबिन क्रु सोबतचे छायाचित्रही पोस्ट केले.पूजा चिंचणकर या एअर इंडियामध्ये एअर होस्टेस म्हणून १९८० मध्ये रूजू झाल्या होत्या. तब्बल ३८ वर्षांची प्रदीर्घ सेवा बजावून त्या ३१ जुलै रोजी निवृत्त झाल्या. सेवा बजावून निवृत्त होताना पूजा अत्यंत भावूक झाल्या होत्या. त्यातच एअर होस्टेस म्हणून कारकिर्दीच्या शेवटच्या विमानाचे सारथ्य मुलगी सह वैमानिक बनून करत असल्याने त्यांचा आनंद द्विगुणीत झाला होता. मुलीने वैमानिक व्हायचे स्वप्न त्यांनी अश्रिताच्या लहानपणापासून पाहिले होते व अश्रिता यांनी त्यांचे स्वप्न पूर्ण तर केलेच शिवाय निवृत्तीच्या दिवशी शेवटच्या विमानाचे सारथ्य करून त्यांना आयुष्यभरासाठी गोड भेट दिली.विमान प्रवासाला प्रारंभ होण्यापूर्वी अश्रिताने प्रवाशांना माहिती याबाबत माहिती दिली. आईचे स्वप्न पूर्ण करण्यात अभिमान वाटत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यानंतर प्रवाशांनी अश्रिता व तिच्या आईचे टाळ््यांच्या गजरात स्वागत केले. पूजा यांनी प्रवाशांसमोर येत प्रवाशांच्या अभिवादनाचे स्वागत केले. आईचा वारसा पुढे नेण्याची ग्वाही अश्रिता यांनी टष्ट्वीटद्वारे दिली. बेंगळुरूयेथून मुंबई जाणाऱ्या विमानात हा भावनात्मक प्रसंग घडला. बेंगळुरू येथून मुंबई जाणा-या एअरबस ए ३१९ (व्हीटी-एससीव्ही) या विमानाचे सारथ्य त्यांनी केले.शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर अश्रिताने कॅनडामध्ये जावून २००६ मध्ये वैमानिकाचे प्रशिक्षण घेतले. २००८ मध्ये व्यावसायिक वैमानिक परवाना त्यांना मिळाल्यानंतर त्या भारतात परतल्या. मधल्या काळात हवाई वाहतूक क्षेत्रात आलेल्या मंदीमुळे अश्रिताला नोकरीसाठी धावाधाव करावी लागली. २०१६ मध्ये अश्रिता एअर इंडियामध्ये सह वैमानिक म्हणून रूजू झाली.‘त्यावेळी अवघडल्यासारखे वाटायचे’दोन वर्षांच्या कालावधीत आम्ही अनेकदा एकाच विमानात सेवा बजावली आहे. कामावर असताना माझी आई पूर्णत: व्यावसायिक दृष्ट्रीकोनातून काम करत होती व कॉकपिटमध्ये येवून मला कॅप्टन संबोधून चहा घेणार का कॉफी असा प्रश्न विचारत असल्याचे अश्रिता म्हणाल्या.आई जेव्हा विमानात मला कॅप्टन संबोधून बोलत असे त्यावेळी मला अत्यंत अवघडल्यासारखे वाटत होते. त्यांच्या नोकरीच्या शेवटच्या विमानफेरीचे सारथ्य करण्यास मिळणे हा माझ्यासाठी कौतुकाचा व अभिमानाचा क्षण असल्याचे अश्रिता म्हणाल्या.
शेवटच्या विमान फेरीचे मुलीने केले ‘सारथ्य’; प्रवाशांनीही केले टाळ्यांच्या गजरात स्वागत
By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2018 5:07 AM