मुंबई : मागील चार वर्षांत लोकांना घर खरेदी करणे अधिकाधिक न परवडणारे होत गेले आहे. या काळात घरांचा किफायतशीरपणा नीचांकी पातळीवर गेला आहे, असे रिझर्व्ह बँकेच्या एका अहवालातून समोर आले आहे.
रिझर्व्ह बँकेचे तिमाही ‘निवासी मालमत्ता किंमत निगराणी सर्वेक्षण’ काल जाहीर झाले. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. सर्वेक्षण अहवालात म्हटले आहे की, घरांच्या किमती आणि लोकांचे उत्पन्न याचे गुणोत्तर मागील चार वर्षांत वाढले आहे. २0१५ मध्ये ५६.१ टक्के असलेले हे गुणोत्तर २0१९ मध्ये ६१.५ झाले आहे. देशातील सर्वांत महागडे शहर असतानाही मुंबईतील घरांचा किफायतशीरपणा मात्र सुधारला आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मुंबईतील घरांच्या किमती आणि उत्पन्न याचे गुणोत्तर ७६.९ होते. ते यंदाच्या मार्चमध्ये सुधारून ७४.४ झाले आहे.
भुवनेश्वर हे देशातील सर्वाधिक किफायतशीर घरांचे शहर ठरले आहे. तेथील किंमत-उत्पन्न गुणोत्तर मार्चच्या तिमाहीत ५४.३ झाले. मार्च २0१५ मध्ये ते ४७.२ होते.घर खरेदी करणे नागरिकांना कितपत परवडणारे आहे, हे पाहण्यासाठी किंमत-उत्पन्न गुणोत्तर ही कसोटी वापरली जाते. ‘अॅनॉरॉक प्रॉपर्टी कन्सल्टन्ट’चे चेअरमन अनुज पुरी यांनी सांगितले की, देशातील घरांच्या किमती आणि लोकांचे प्रत्यक्षातील उत्पन्न यात मोठी तफावत आहे. गेल्या चार वर्षांत ही तफावत अधिकाधिक वाढत गेली आहे.
खरेदीदार नसल्याने किमतीत घटघर खरेदी करण्यासाठी लागणाऱ्या उत्पन्न वर्षांच्या संख्येत वाढ झाली आहे. म्हणजेच आता घर खरेदीसाठी पूर्वीपेक्षा अधिक वर्षांचे उत्पन्न लोकांना खर्च करावे लागत आहे. ग्राहकी नसल्यामुळे गेल्या चार वर्षांत घरांच्या किमतीत घट झालेली असतानाही ही स्थिती आहे