Join us  

धर्मशाळेला अखेरची घरघर

By admin | Published: November 05, 2015 11:20 PM

खेड तालुका : दाभीळ येथील ब्रिटिशकालीन वास्तूची दुरवस्था

सुनील आंब्रे -- आवाशीppमुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गालगत खेड तालुक्यातील दाभीळ येथे असणाऱ्या ब्रिटिशकालीन धर्मशाळेची दुरवस्था झाली असून, सध्या ती शेवटची घटका मोजत आहे. या ब्रिटिशकालीन धर्मशाळेबाबतची माहिती घेतली असता उपसरपंच पांडुरंग गुणदेकर यांनी सांगितले की, त्याकाळी जिल्ह्यात गावांना अथवा तालुक्यांना जोडणारी दळणवळणाची वाहतूक करण्यासाठी रस्त्यांची सोय नव्हती. त्यामुळे चिपळूण, गुहागर किंवा खेड, दापोली, मंडणगड येथील तेव्हाचे नागरिक बैलगाडीने किंवा पाऊलवाटेने ये - जा करत असत. स्वाभाविकपणे हे अंतर कापण्यासाठी खूप वेळ जायचा. मग ते वाटसरू या धर्मशाळेत विश्रांतीसाठी थांबत असत. कधी कधी हेच वाटसरु तेथे धान्य शिजवून तेथेच भक्षण करत व झोपी जात असत. त्याचबरोबर त्याकाळी खेड तालुक्यासाठी स्वतंत्र न्यायालयाची व्यवस्था नव्हती. त्याकाळी दापोली येथे न्यायालय सुरु होते. मात्र न्यायालयात एखादा वाद नेण्यापूर्वी या परिसरातील दाभीळ, लवेल, माणी, सवेणी, आंजणी, बोरज, आवाशी, गुणदे या गावांतील गावकऱ्यांच्या अडीअडचणी सोडवण्याच्या दृष्टीने चर्चा केली जाई. बहुतांश वाद शक्यतो चर्चेने सोडवले जात असत. सर्व गावांतील लोकांना मध्यवर्ती आणि एकत्र येण्यासाठी चावडी म्हणून या धर्मशाळेचा उपयोग केला जात असे.धर्मशाळेच्या इमारतीसह जवळपास तीस गुंठे क्षेत्र असणाऱ्या या परिसरात त्याकाळी केलेली खुंटी कलमे आजही उभी आहेत. धर्मशाळेबरोबर या आवाराचे रक्षण करण्यासाठी तत्कालीन ब्रिटिश सरकारने एका पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक केली होती. तो अधिकारी येथे रात्रंदिवस पहारा देत असे. दगडगोटे व मातीपासून उभारलेली ही कौलारु इमारत आज पडक्या अवस्थेत तग धरून आहे. मिळालेल्या माहितीनुसार अंदाजे ३५ वर्षांपूर्वी या इमारतीची डागडुजी करण्यात आली होती. ती सरकारी निधीतून केली की, ग्रामपंचायतीने केली, याबाबत अधिकृत माहिती उपलब्ध होत नाही.मात्र, महामार्गालगत असणाऱ्या या सरकारी भूखंडात ग्रामपंचायत कमिटीने सरकारकडून ती ग्रामपंचायतीला वर्ग करण्यासाठी सर्व स्तरावरून प्रयत्न सुरु केले आहेत. त्याला संबंधित यंत्रणेकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे सरपंच-उपसरपंच व ग्रामसेवकांनी सांगितले. भूखंड ग्रामपंचायतीला मिळाल्यास ग्रामपंचायत कार्यालय, गावची अंगणवाडी, बसस्थानक आहे म्हणून जवळच स्वच्छतागृह, आठवडा बाजार, वाचनालय, व्यायामशाळा आदी उपक्रम राबवण्याचा ग्रामपंचायतीचा मनोदय असल्याचे सांगितले.याचा पाठपुरावा सुरू असून, विद्यमान कमिटीने १९ सप्टेंबर २०१५ रोजी जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे हा भूखंड ग्रामपंचायतीला मिळालाच, तर हा उपक्रम राबवून ब्रिटिशकालीन इमारतीचा इतिहास जपला जाईल.चुकीची विक्री : भूमिहीन असल्याचा दाखला देऊन खरेदीही जागा एकाने विकत घेतली आहे. संबंधित व्यक्ती ही राज्याच्या मागील सरकारच्या एका बड्या मंत्र्याच्या गाडीवर चालक असल्याचे समजते. प्रथम त्याने भूमिहीन असल्याचा दाखला जोडत शासनाची फसवणूक केली. मात्र, तो भूमिहीन नसल्याचे पुरावे सादर केल्यानंतर त्याने मी मागासवर्गीय असून, तो भूखंड मला मिळावा, अशी सरकारकडे विनंती केली. त्यानुसार सर्व्हे नं. ३१८ व ३१९ यामधील ३.५६ क्षेत्र त्याच्या नावे ७/१२ नोंदीत असल्याचे समजते. मात्र, याबाबत अधिक माहिती घेतली असता अशा प्रकारची विक्री करता येत नसल्याचे एका महसूल अधिकाऱ्याने सांगितले.बांधकामच केले नाहीविश्वसनीय गोटातून मिळालेल्या माहितीनुसार या तीस गुंठे क्षेत्रावरील ३.५६ गुंठे क्षेत्र तालुक्यातील एका खासगी व्यक्तिला पंधरा वर्षांपूर्वी विकले असल्याचे समजते. त्याने तेथे तसे रेखांकन करून कुंपणही घातले आहे. मात्र, अद्याप त्यावर कसल्याही प्रकारचे बांधकाम केलेले नाही.