Join us

‘डीसी लोकल’चा अखेरचा प्रवास

By admin | Published: April 10, 2016 3:22 AM

मुंबईकरांच्या सेवेत तब्बल ९१ वर्षे घालवल्यानंतर डायरेक्ट करंट (डीसी) विद्युतप्रवाहावर धावणारी शेवटची ९ डब्यांची लोकल शनिवारी मध्यरात्री हार्बर मार्गावर धावली. विशेष लोकलच्या प्रवासासाठी

मुंबई : मुंबईकरांच्या सेवेत तब्बल ९१ वर्षे घालवल्यानंतर डायरेक्ट करंट (डीसी) विद्युतप्रवाहावर धावणारी शेवटची ९ डब्यांची लोकल शनिवारी मध्यरात्री हार्बर मार्गावर धावली. विशेष लोकलच्या प्रवासासाठी रेल्वेने १० हजार रुपयांचे तिकीट आकारले होते. मात्र याकडे प्रवाशांनी पाठ फिरवली. जे.जे. स्कूल आॅफ आर्टसकडे सुमारे चारशे प्रवाशांनी यासंबधीच्या तिकिटांबाबत चौकशी केली होती. तर शेवटच्या लोकलचा मोटरमन होण्याचा मान जी.आर.मीना यांना आणि गार्ड होण्याचा मान ए.के.प्रसाद यांना मिळाला.कुर्ला स्थानकाहून शनिवारी रात्री ११.३० वाजता हार-फुलांनी सजवलेली डीसी लोकल आपल्या पहिल्या मार्गावर अखेरचा प्रवास करण्यासाठी निघाली; आणि मध्यरात्री १२.१५ वाजता ही लोकल सीएसटी स्थानकात पोहोचली. यावेळी खासदार राहुल शेवाळे, खासदार अरविंद सांवत, मध्य रेल्वेचे व्यवस्थापक सुनीलकुमार सूद, जनसंपर्क अधिकारी नरेंद्र पाटील यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.सानपाडा कारशेडमध्ये सजवण्यात आलेल्या डीसी मार्गावरील या शेवटच्या लोकलला अखेरचा सलाम करण्यासाठी मध्य रेल्वे अधिकारी-कर्मचारी, लोकलप्रेमींनी गर्दी केली होती. शेवटच्या लोकलप्रवासाच्या धावत्या आठवणी साठवून ठेवण्यासाठी लोकलमध्ये तीन डबे प्रवाशांसाठी राखीव ठेवण्यात आले होते. हार्बर मार्गावरील प्रत्येक स्थानकावर वाजत गाजत लोकलचे स्वागत केले जात होते. हार्बरवर १९२५ साली सर्वप्रथम सीएसटी ते कुर्ला अशी डीसी लोकल धावली होती. याच मार्गावर या लोकलचा शेवटचा प्रवासही झाला. (प्रतिनिधी)