Join us

शेवटच्या टप्प्यात निवडणुकीला हिंसाचाराचे गालबोट

By admin | Published: November 02, 2015 2:53 AM

गोळीबार व हाणामारीच्या घटनांमुळे कल्याण-डोंबिवलीत दहशतीचे वातावरण असताना, मतदान प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात सायंकाळच्या सुमारास डोंबिवलीत भाजप आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये

कल्याण : गोळीबार व हाणामारीच्या घटनांमुळे कल्याण-डोंबिवलीत दहशतीचे वातावरण असताना, मतदान प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात सायंकाळच्या सुमारास डोंबिवलीत भाजप आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हाणामारी झाली. त्यामध्ये एकजण गंभीर जखमी झाला.नितीन पालन या भाजपच्या कार्यकर्त्यावर तलवारीने प्राणघातक हल्ला झाला. जखमी पालन याला उपचाराकरिता खासगी इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. मनसेच्या मंदा पाटील यांचे पती सुभाष पाटील यांनी हा हल्ला केल्याचा आरोप भाजपाने केला, तर भाजपाच्या ५० ते ६० जणांनी आपल्यावर हल्ल्याचा कट रचला होता. त्यांना रोखताना पालन जखमी झाले, असा दावा पाटील यांनी केला. या संदर्भात पोलिसांनी काहीजणांना ताब्यात घेतले आहे.कल्याणमध्ये खडकपाडा आणि फ्लॉव्हर व्हॅली येथे बोगस मतदानाच्या घटना घडल्या. यात दोन व्यक्तींना अटक करण्यात आली असून, येथून मोठया प्रमाणावर बोगस मतदार कार्ड जप्त करण्यात आली.कल्याणमध्ये भाजप उमेदवाराचा नातलग रितेश सिंग याच्यावर झालेला प्राणघातक हल्ला, डोंबिवलीत शिवसेना उमेदवाराच्या समर्थकाच्या घरावर झालेला गोळीबार, शहरप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांच्या गाडीची झालेली तोडफोड या घटनांनी गेले तीन दिवस दहशतीचे वातावरण असताना, मतदानाच्या पूर्वसंध्येला शनिवारी भाजपचे उमेदवार तथा उपमहापौर राहुल दामले आणि राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश शिंदे यांच्यात वादावादी होऊन यात दामले यांच्या कार्यालयाची तोडफोड झाली. त्यामुळे सर्वच निवडणूक केंद्रांवर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. केंद्राच्या १०० मीटर परिसरात थांबण्यास मनाई केली जात होती. उमेदवारांनाही मतदान केंद्रातून तत्काळ बाहेर जाण्यास सांगण्यात येत होते.पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावीपाथर्ली येथे हल्ला होत असताना ज्या पोलिस अधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिक घेतली त्यांची वरिष्ठ पातळीवर चौकशी व्हावी आणि त्यांच्यावर कारवाई व्हावी यासाठी स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांनी पत्र दिले आहे. दरम्यान हल्ला करणाऱ्या काही लोकांना अटक करण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.