Join us

दाऊद दळवी यांना अखेरचा निरोप

By admin | Published: September 02, 2016 1:35 AM

ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. दाऊद दळवी यांचा दफनविधी गुरुवारी सकाळी पार पडला. या वेळी ठाण्यात सर्वत्र शोककळा पसरली होती.

ठाणे : ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ डॉ. दाऊद दळवी यांचा दफनविधी गुरुवारी सकाळी पार पडला. या वेळी ठाण्यात सर्वत्र शोककळा पसरली होती. डॉ. दाऊद दळवी यांचे बुधवारी रात्री ८ वा. दीर्घकाळ आजाराने त्यांच्या राहत्या घरी निधन झाले. गुरुवारी सकाळी १०.३० वा. त्यांच्या राहत्या घरातून त्यांचा जनाजा काढण्यात आला. उथळसर येथील दफनभूमीत त्यांचा दफनविधी झाला. या वेळी महापौर संजय मोरे, माजी खा. सतीश प्रधान, नगरसेवक नरेश म्हस्के, काँग्रेसचे बाळकृष्ण पूर्णेकर, नजीब मुल्ला, वेगवेगळ्या संस्थांचे पदाधिकारी, समस्त ठाणेकर या वेळी उपस्थित होते. त्यांच्या राहत्या घरी सकाळी ८ वाजल्यापासून १० वाजेपर्यंत अंत्यदर्शनासाठी रीघ लागली होती. शनिवार, ३ सप्टेंबर रोजी सकाळी १० वा. ज्ञानसाधना महाविद्यालय येथे समस्त ठाणेकरांच्या वतीने शोकसभेचे आयोजन केले आहे. या वेळी शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)दाऊद दळवी सरांचा शैक्षणिक, सामाजिक आणि इतिहास क्षेत्रात फार मोठा सहभाग होता. ठाण्याच्या दृष्टीने आणि ठाणेकरांच्या दृष्टीने ते ठाण्याचे वैभव होते. सातत्याने तिन्ही क्षेत्रांत त्यांनी मोठे काम केले. अनेकांना घडवले आणि कोकणचा इतिहास त्यांनी जिवंत केला, अशा थोर शिक्षकास आदरपूर्वक श्रद्धांजली.- संजय केळकर, आमदारदळवीसर माझ्यासाठी गुरुतुल्य व्यक्तिमत्त्व होते. महाराष्ट्रातील बऱ्याचशा भागांत मी त्यांच्यासोबत फिरलो आहे. ठाण्यात वस्तुसंग्रहालय व्हावे, ही त्यांची तीव्र इच्छा होती. कोकणचा समग्र इतिहास त्यांना प्रसिद्ध करायचा होता. - सदाशिव टेटविलकर, इतिहास अभ्यासकज्येष्ठ इतिहास संशोधक, शिक्षणतज्ज्ञ आणि साहित्यिक दाऊद दळवी यांच्या निधनाने इतिहासलेखनातील एका अग्रणी व्यक्तिमत्त्वाला आपण मुकलो आहोत. ठाण्यातील शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक विश्वातील त्यांचे योगदान अमूल्य होते. विविध शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले. कोकण इतिहास परिषदेच्या माध्यमातून त्यांनी कोकणचा, विशेषत: ठाण्याचा इतिहास जगासमोर आणण्याचा वसा घेतला होता. त्यांच्या निधनाने झालेली हानी कधीही न भरून येणारी आहे. ईश्वर मृतात्म्यास शांती देवो, हीच प्रार्थना- एकनाथ शिंदे, पालकमंत्रीदाऊद दळवी हे थोर इतिहासतज्ज्ञ होतेच, परंतु आमच्यासाठी उत्तम मार्गदर्शक होते. या देशाचा पूर्ण इतिहास त्यांना ज्ञात होता. हिंदुस्थानच्या संस्कृतीची जाण असणारे आणि त्याप्रमाणे आचरणात आणणारे व्यक्ती होती.- संजय मोरे, महापौरज्ञानसाधना महाविद्यालयात संस्कार, क्रीडा, साहित्य या सगळ्यांची जोपासना करीत त्यांनी महाविद्यालयाला मोठे केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थी घडले, त्या सर्व विद्यार्थ्यांना दाऊद दळवी सर हे आमचे गुरू आहेत, हे सांगण्यात मोठा सन्मान वाटतो.- प्रा. प्रदीप ढवळ, ज्ञानसाधना महाविद्यालय