नेसरीकरांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप
By admin | Published: May 26, 2015 02:06 AM2015-05-26T02:06:33+5:302015-05-26T02:06:33+5:30
काळबादेवी आगीत गंभीर जखमी अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर यांच्या पार्थिवावर सोमवारी चंदनवाडी स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
मुंबई : काळबादेवी आगीत गंभीर जखमी अग्निशमन अधिकारी सुनील नेसरीकर यांच्या पार्थिवावर सोमवारी चंदनवाडी स्मशानभूमीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अग्निशमन दलाचे कर्मचारी, अधिकारी, मित्रपरिवार आणि नातेवाइकांनी नेसरीकर यांना साश्रू नयनांनी अखेरचा निरोप दिला.
ऐरोलीतील नॅशनल बर्न्स सेंटरमध्ये तब्बल १६ दिवस नेसरीकर यांनी मृत्यूला झुंज दिली. सोमवारी सकाळी अंधेरी येथील राहत्या घरी त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले. त्यानंतर भायखळा केंद्रात पालिकेच्या वतीने नेसरीकर यांना मानवंदना दिली. कर्मचारी, अधिकारी आणि मित्रपरिवाराने या वेळी गर्दी केली होती.(प्रतिनिधी)
भायखळा केंद्रातून फुलाने सजवलेल्या ट्रकमध्ये त्यांचे पार्थिव चंदनवाडी स्मशानभूमीकडे निघाले. ट्रकच्या पुढे आणि मागे पोलीस आणि अग्निशमन दलाच्या वाहनांचा ताफाही सामील झाला होता. अंत्ययात्रा सीएसटी रेल्वे स्थानकासमोर पोहोचताच आझाद मैदान पोलिसांनी मानवंदना दिली. यानंतर वासुदेव बळवंत फडके चौकातून अंत्ययात्रा चंदनवाडी स्मशानभूमीत पोहोचली.